Latest

ताशी ८० मैल वेगाने भंगत आहे अंटार्क्टिकामधील ग्लेशियर

Arun Patil

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीचा मोठा परिणाम दोन्ही ध्रुवांच्या परिसरात ठळकपणे पाहायला मिळत आहे. तेथील बर्फ, ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. आता तर संशोधकांनी अंटार्क्टिकामधील ग्लेशियर भंगण्याचा सर्वाधिक वेग नोंदवला आहे. हा वेग आहे ताशी 80 मैल म्हणजेच ताशी 129 किलोमीटर! एखादे ग्लेशियर भंगण्याचा हा सर्वाधिक वेग ठरला आहे.

इतक्या वेगामुळे एखादी काच फुटून तिचे तुकडे झाल्याप्रमाणे हे ग्लेशियर विखरून जाईल. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील स्टेफनी ऑलिंगर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा वेग आमच्या ज्ञात वेगांपैकी सर्वाधिक आहे. विशिष्ट प्रसंगी हे ग्लेशियर तुटून ते विखुरले जाऊ शकते हेच या वेगावरून दिसून येते. भविष्यातही अशा घटना घडू शकतात.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'एजीयू अडव्हान्सेस' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पश्चिम अंटार्क्टिकाच्या पाईन आयलंड ग्लेशियरवर 2012 मध्ये 10.5 किलोमीटर लांबीची भेग दिसून आली होती. हे ग्लेशियर बर्फाचा साठा समुद्रात मिसळण्यापासून रोखणारे आहे. तेच दुभंगत असल्याने अंटार्क्टिकावरील बर्फाचा साठा मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. संशोधनासाठी सॅटेलाईट निरीक्षण आणि बर्फाच्या स्तरातील सेस्मिक डाटाचा संयुक्त वापर करण्यात आला.

SCROLL FOR NEXT