Latest

Lok Sabha Election 2024 : सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. ( Lok Sabha Election 2024 )

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या पक्षातर्फे सातार्‍यामधून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. परंतु या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना भाजप उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राजकीय मतभेद असल्यामुळे उदयनराजे यांना उमेदवारी देण्यास अजित पवार यांचा विरोध असल्याचे समजते. यामुळे दिल्लीने हिरवा कंदील दिला असला तरी अद्यापही भाजपने सातार्‍यामधून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केली नाही.

नाशिक हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा, अशी अजित पवार यांची इच्छा आहे. या मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा अजित पवार यांचा मानस आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. नैसर्गिक न्यायानुसार या मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला आहे. परंतु नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघावरील दावा सोडावा, असा भाजपचा आग्रह आहे. परंतु उदयनराजे यांच्याऐवजी अन्य उमेदवार दिल्यास आपला पाठिंबा राहील, अशी अजित पवार यांनी भूमिका घेतली आहे. मात्र, ही भूमिका भाजपला मान्य नाही.

सातारा, नाशिकसह ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांबाबतही रस्सीखेच सुरू आहे. ( Lok Sabha Election 2024 )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT