Latest

‘जय श्री राम’चा नारा देणा-या विद्यार्थ्याची हकालपट्टी करणे महिला प्रोफेसर पडले महागात, कॉलेजने केले निलंबन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझियाबादमधील एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी स्टेजवरून 'जय श्री राम'चा जयघोष करताना दिसतो. मात्र, विद्यार्थ्याच्या या कृतीवर तिथे उपस्थित असणा-या महिला प्रोफेसरने आक्षेप घेतला आणि त्या विद्यार्थ्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगितले. आता याप्रकरणी कॉलेजने कडक कारवाई करत थेट त्या महिला प्रोफेसरचे निलंबन केले आहे. याशिवाय यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या संचालकांचा खुलासा

या प्रकरणी एबीईएस महाविद्यालयाचे संचालक संजय कुमार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात की, 'महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीला 24 तासांच्या आत शिफारशी देण्याच्या सूचना महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे महिला प्रोफेसरचे वर्तन अयोग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे,' असा खुलासा केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गाझियाबादमधील एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान, एक विद्यार्थी परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर पोहोचतो. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जय श्री रामचा जयघोष केला. स्टेजवरील विद्यार्थी त्याला प्रतिसाद देतो आणि जय श्री राम म्हणतो. अशातच स्टेजवरील विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील एका प्रोफेसरला राग येतो. त्यामुळे ती स्टेजजवळ जाते आणि संबधीत विद्यार्थ्याला त्याच्या सादरीकरणादरम्यान रोखते. ही घोषणाबाजी करण्याची जागा नाही, असे म्हणत महिला प्रोफेसर विद्यार्थ्याला सुनावते. यानंतर ती विद्यार्थ्याला 'गेट आउट' म्हणत स्टेजवरून खाली उतरवते.

पोलिसांच्या कारवाईनंतर महाविद्यालयाची कारवाई

सोशल मीडियावर हा प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी संबधीत महिला प्रोफेसरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. गाझियाबाद पोलीसांनीही या प्रकरणाची दखल घेतली. त्यासंदर्भात पोलीस आयुक्तालयाने आपल्या सोशल मीडिया एक्स अकौंटरून एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटले की, 'स्टेशन प्रभारी क्रॉसिंग रिपब्लिक यांना चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.'

SCROLL FOR NEXT