Latest

नैराश्येच्या गर्तेतून बाहेेर पडताना…

अमृता चौगुले

खरं तर नैराश्य ही मानसिक स्थिती असल्याने त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. पण ते ओळखण्यासाठी शारीरिक आजारांसारखे मापदंड नसल्याने रुग्ण डिप्रेशनचा त्रास सहन करतोय हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो.

जीवनाच्या विविध टप्प्यांवर माणसाला उदास वाटतं. कधी मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही, संधी मिळाली नाही, इतरांकडे पाहून ते आपण करू शकत नाही ही बोच निर्माण झाली किंवा जवळच्या व्यक्तीचं जीवनातून एकदम जाणं, एखादी गोष्ट मनाविरुद्ध करावी लागणं, नवीन वातावणात, संस्कृतीत अ‍ॅडजेस्ट न होणं किंवा होमसिकनेस येणं अशा काही घटनांचा मनावर बराच काळ परिणाम होतो. ते नैसर्गिक आहे. पण हा परिणाम जर माणसाच्या संवेदनाच कमी करत असेल, तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि आरोग्यावर होतो. त्याच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवतो.

बोलण्यात, लोकांत मिसळण्यात, गाणी म्हणण्यात, आनंद व्यक्त करण्यात त्याला रस वाटेनासा होतो. इतकंच काय, पहिल्यांदा ज्या गोष्टीत त्याला रस असतो त्यातही त्याला काही करावंसं वाटत नाही. रोजच्या कामाला जाणं किंवा अन्य काही करणं अशा गोष्टी तर दूरच; पण जेवण किंवा अंघोळ करणं यातही त्याला रस वाटेनासा होतो. जगण्याची आशा संपल्यासारखा त्याचा व्यवहार होऊ लागतो. याला नैराश्येची लक्षणं म्हणता येतील. रुग्णांच्या बाबतीत ती वेगवेगळी असू शकतात. काहीवेळा रूटीन गोष्टी करायच्या म्हणून करणारी; पण जगण्यातलं स्वारस्य संपलेली माणसंही पाहायला मिळतात. तीही या रोगाच्या सीमारेषेवर आहेत असं म्हणायला हरकत नाही.

नैराश्येचा मनाप्रमाणेच शरीरावरही परिणाम होत असतो. त्यात मरगळ वाटणे, उदास राहणे, सतत रडू येणे, मनात हीनत्वाची भावना निर्माण होणे, लहान-सहान निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे अशा मानसिक लक्षणांबरोबरच थकवा येणे, भूक न लागणे, उत्साहाची कमतरता जाणवणे, सतत आजारी असल्याचं जाणवणं ही लक्षणं दिसतात. कधी कधी पोट बिघडणं, पाठदुखी, अंगदुखी अशी शारीरिक दुखणीही डोकं वर काढतात. त्याची कारणं कळत नाहीत, त्यामुळे डॉक्टरांकडूनही त्याचा योग्य उपचार होत नाही. खरं तर नैराश्य ही मानसिक स्थिती असल्याने त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. पण ते ओळखण्यासाठी शारीरिक आजारांसारखे मापदंड नसल्याने रुग्ण नैराश्येचा त्रास सहन करतोय हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो. त्यातून त्यावर उपचार करण्यासाठी औषधांबरोबरच मानसिक उपचारांची गरज आहे हे रोग्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना पटवून द्यायलाही वेळ लागतो.

एखाद्या व्यक्तीला नैराश्येमधून बाहेर काढायचं असेल, तर दोन्ही पातळ्यांवर लढाई द्यावी लागते. शारीरिक तक्रारींवर औधषे देण्याबरोबरच त्याला मानसिक आधाराचीही गरज असते. त्यासाठी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला चांगलं वातावरण देणं, त्याला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवणं, त्याच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देणं आणि त्याचा आत्मविश्वास जागवणं अशा अनेक पातळ्यांवर काम करावं लागतं. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा असलेली माणसं आजूबाजूला असणं फार महत्त्वाचं ठरतं. काही कारणाने ती व्यक्ती स्वत:ला दोषी मानत असेल, तर तिला या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारी माणसं त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असायला हवीत.

काहीवेळा एखादी परिस्थिती बदलल्यानेही माणसाच्या मानसिकतेत फरक पडू शकतो. जीवनात काही गोष्टी अटळ आहेत, हे त्याला समजावून द्यावं लागतं. जसं की, एखाद्या जवळच्या माणसाच्या मृत्यूने कोणी निराशेच्या गर्तेत गेलं असेल तर जीवन-मरण हा निसर्गाचा नियम आहे, हे त्याला समजावून द्यावं लागतं. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ वेगळे उपाय करतात. त्यामुळे नैराश्येमधून बाहेर येताना मानसिकता बदलणं हे फार गरजेचं आहे.

मनाला उत्साह देण्यासाठी योगसाधनेचाही चांगला परिणाम झालेला दिसून येतो. ॐकार गुंजन, प्राणायाम, नामस्मरण या गोष्टींनी मनाला शांती मिळवून देता येते असं आता प्रयोगाअंती सिद्ध झालं आहे. मनावरचा ताण कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. नैराश्येमध्ये हेच मत्त्वाचं असतं. मात्र केवळ या उपायांनी लवकर बरं वाटणार नाही म्हणून मनोचिकित्सकांचा आधारही तितकाच महत्त्वाचा आहे. या दोन्ही पातळ्यांवर लढाई दिली तर नैराश्येच्या गर्तेतून बाहेर पडणं शक्य आहे.

-डॉ. भारत लुणावत

SCROLL FOR NEXT