Latest

तीन लाखांत व्हा टीईटी पास..! व्हिडिओ क्लिप प्रकरण

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : एका अधिकार्‍याने तीन लाखांमध्ये परीक्षा परिषदेतून टीईटी पास करून देण्याची ऑफर दिल्याचा व्हिडिओ बाहेर आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणाची परीक्षा परिषदेकडून चौकशी सुरू असून, याचे कनेक्शन थेट 'पुण्या'पर्यंत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नगरच्या व्हिडिओ क्लिपमधून डीएड व टीईटी परीक्षेची कशी सौदेबाजी चालते, हे पुढे आले. यात परीक्षा परिषदेच्या काही लोकांचाही समावेश असावा, असेच वरवर तरी दिसत आहे.

आता या प्रकरणाची डाएटचे भगवान खार्के, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस हे चौकशी करत आहे. चौकशीत संबंधित अधिकारी कोण, त्याचा हा व्हिडिओ कधीचा आहे, तो आताच बाहेर कसा आला, त्यातील सौदेबाजी करणारी दुसरी व्यक्ती कोण आहे, त्याच्या पाल्याचा निकाल काय लागला, तो व्हिडिओ व्यक्तीदोषातून एडीट केलेला आहे की ओरीजनल, त्यात नामोल्लेख असलेल्या पुण्यातील 'त्या' व्यक्तींचा यात काय सहभाग आहे का, याची पडताळणी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. त्यामुळे या चौकशीकडे लक्ष लागलेले आहे.

परीक्षा परिषदच आरोपीच्या पिंजर्‍यात!
टीईटी परीक्षेसंदर्भातील व्हिडिओ क्लिपच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे. ही समिती 'त्या' स्थानिक कर्मचार्‍यांची चौकशी करेलही. मात्र, ज्या परीक्षा परिषदेवरच तीन लाखांत पास करून देण्याचा ठपका आहे, त्यांची चौकशी नगरच्या अधिकार्‍यांऐवजी शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे यांनीच करावी, अशी मागणी केली जात आहे.

SCROLL FOR NEXT