Latest

पुण्याच्या GEMCOVAC-OM या एमआरएनए कोविड-19 बूस्टर वॅक्सीनला DCGI कडून मान्यता

अमृता चौगुले

पुणे: जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड या पुणे स्थित कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या GEMCOVAC®-OM या एमआरएनए कोविड-19 बूस्टर वॅक्सीनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (EUA) मिळाले आहे. सार्स-सीओव्ही-2 च्या ओमिक्रोन व्हेरियंटच्या विरोधात हे वॅक्सीन वापरता येणार आहे.

GEMCOVAC®-OM हे अतिशय संसर्गजन्य ओमिक्रोन व्हेरियंटच्या विरोधात भारतात विकसित करण्यात आलेले पहिले बूस्टर कोविड-19 वॅक्सीन आहे. भारतातील 13 शहरांमधील 20 केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल परीक्षणांमध्ये GEMCOVAC®-OM च्या खूप चांगल्या रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आढळून आल्या आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणांमध्ये जवळपास 3000 व्यक्तींना GEMCOVAC®-OM देण्यात आले आणि हे वॅक्सीन सुरक्षित असल्याचे आढळून आले.

प्रतिबंधात्मक/बूस्टर डोस म्हणून वापरली जाणारी, सध्या मंजुरी देण्यात आलेली वॅक्सीन सार्स-सीओवी-2 या आधीच्या व्हेरियंटविरोधात वापरासाठी तयार करण्यात आली होती.  ही वॅक्सीन अँटीबॉडी टायटर वाढवणारी जरी असली तरी सार्स-सीओवी-2 च्या पसरत चाललेल्या ओमिक्रोन प्रकाराला न्यूट्रलाइज करण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. ओमिक्रॉन वेरियंटसाठी विशिष्ट अँटीबॉडीज आणि मेमरी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित केल्याने संसर्ग आणि हॉस्पिटलायझेशनची संभाव्यता कमी होईल आणि भविष्यातील साथीच्या लाटा टाळता येतील. भारतात तयार करण्यात आलेले GEMCOVAC®-OM या कमतरता दूर करते.

GEMCOVAC®-OM हे लायोफिलाइज्ड (फ्रीझ ड्राइड) वॅक्सीन आहे जे 2-8 अंश सेल्सियसला स्थिर राहते. फार्माजेट, यूएसएने विकसित केलेले ट्रॉपिस® हे साधन वापरून हे वॅक्सीन दिले जाते. या साधनामध्ये सुई नाही त्यामुळे सुईची भीती वाटणे, वेदना आणि सुईमुळे होणारी जखम यासारखे सुईच्या वापराचे धोके टाळले जातात.

जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ डॉ संजय सिंग यांनी सांगितले, "आजवर पूर्ण न केल्या गेलेल्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याच्या जागतिक वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जेनोवा टीम आरोग्याशी संबंधित आणीबाणीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. कोविड-19 राहणार आहे आणि त्यामध्ये बदल होत राहणार आहेत, त्याच्या नवनवीन व्हेरियंटचा सामना करू शकतील अशा वॅक्सीन विकसित करून तयार राहणे आपल्यासाठी गरजेचे आहे.  भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या एमआरएनए प्लॅटफॉर्ममुळे भविष्यातील कोणत्याही व्हेरियंटसाठी तातडीने वॅक्सीन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  अनेक जीवघेण्या आजारांपासून मनुष्यजातीचे रक्षण करण्यात वॅक्सीन्सनी खूप मोलाची भूमिका बजावली आहे."

अधिक चांगल्या आरोग्यासाठी उपाययोजना शोधून काढण्यासाठी संशोधन करण्यासाठी जेनोवा बांधील असल्याचे सांगून जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीओओ श्री समित मेहता यांनी सांगितले, "जेनोवाने भारतातील पहिले ओमिक्रोन-व्हेरियंट वॅक्सीन अवघ्या काही महिन्यांमध्ये यशस्वीपणे विकसित केले आहे.  कोविड-19 वॅक्सीन्ससाठी संपूर्ण जगभरात उपलब्धतेच्या बाबतीत जी आव्हाने उभी राहिली त्याची पुरेपूर कल्पना असल्यामुळे आम्हाला आनंद आहे की आम्ही एमआरएनए या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वॅक्सीन पुरवू शकत आहोत. एमआरएनए तंत्रज्ञान आणि आता ओमिक्रोन विशेष वॅक्सीनसाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला याबद्दल आम्ही वैद्यकीय विश्व, सरकार आणि वैज्ञानिक या आमच्या सर्व हितधारकांचे आभारी आहोत. एमआरएनए प्लॅटफॉर्म हा कोरोना विषाणूच्या विरोधात भारत आणि संपूर्ण जगासाठी संरक्षक ढाल बनून उभा आहे."

SCROLL FOR NEXT