Latest

नोंदीसाठी हवेली तालुक्यात तलाठ्यांवर दबाव, संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

अमृता चौगुले

सिताराम लांडगे

लोणी काळभोर: महसूलच्या बेकायदा नोंदीची कामे करुन घेण्यासाठी गाव कामगार तलाठ्यांवर हवेली तालुक्यात दबावतंत्र वाढत असल्याने सध्या तलाठी संघटना आक्रमक झाली आहे. वेळ प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.

पुणे शहराच्या बाजुला हवेली तालुका विस्तारला आहे. जमिनीच्या व्यवहाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. निर्वेघ जमिनीबरोबर वादाच्या जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणात हवेली तालुक्यात सुरु आहेत. जमिनी संदर्भात सर्व छोटी मोठी कामे गाव कामगार तलाठ्यांकडे असतात. सध्या तर बेकायदा नोंदी नोंदवून घेण्यासाठी तलाठ्याकडे रांगा लागल्या आहेत. सात/बारा, फेरफार ही कामे गाव पातळीवर असल्याने त्या वरील नोंदी धरण्यासाठी तलाठ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबावतंत्र वापरला जात आहे.

कोणी पैशाचे आमिष दाखवून कामे करण्याचा तगादा लावतो तर बहुसंख्य प्रकरणात राजकीय पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काहीजण माहीती अधिकाराचे हत्यार उपसुन त्रास देण्याचे काम करीत आहेत. काहीवेळा वरीष्ठांकडे खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली जाते. एवढे करुनही बेकायदा काम होत नाही म्हणून माध्यमांकडे जाण्याची धमकी दिली जाते.

या सर्व त्रासाला हवेली तालुक्यातील तलाठी कंटाळला असुन या दबावतंत्र टाकणाऱ्या टोळ्यांना न घाबरता कायदेशीर मार्गाने यांचा सामना करावा व यांची बेकायदा कामे करण्यासाठीच्या दबावाला न झुगारता हवेली तालुक्यातील सर्व तलाठी वर्ग आता वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा गाव कामगार तलाठी संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, हवेली तालुक्यात बेकायदा नोंदी बाबत आम्ही सर्व तलाठ्यांना सुचना दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत ते पालन करतात परंतु हवेली तालुक्यात गाव कामगार तलाठ्यांवर दबावतंत्र वापरला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तलाठ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य चोख बजवावे. तालुक्यातील महसूल विभागाचे प्रमुख म्हणून मी सर्व तलाठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी आहे. त्यांना सर्व ती कायदेशीर मदत केली जाईल

हवेली तालुक्यातील तलाठी हे जनतेची सेवा करत आहेत. तालुका मोठा असल्याने कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात आहे. सर्व तलाठी चांगल्या प्रकारे कायदेशीर कामे करतात. त्याच्यावर जर बेकायदा कामासाठी दबाव येत असेल तर उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडचणी मी प्राधान्याने समजून घेणार आहे.
-संजय आसवले, प्रांतधिकारी हवेली

SCROLL FOR NEXT