Latest

IPL 2024 : डिव्हिलियर्सने पंड्याच्या कर्णधारपदावर भाष्य करणे चुकीचे : गौतम गंभीर

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर याने हार्दिक पंड्यावर टीका करणार्‍या एबी डिव्हिलियर्सला फटकारले आहे. एबी डिव्हिलियर्स हा हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर भाष्य करण्यास योग्य नाही, कारण त्याने आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व केले नाही, असे गंभीर म्हणाला. हार्दिक मैदानावर नाटकी वागतो आणि मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ खेळाडूंना ते आवडत नाही, असे डिव्हिलियर्सने म्हटले होते. एबीच्या या विधानावर गंभीर प्रचंड संतापला.

गंभीरने जोरदारपणे हार्दिकचा बचाव केला. तो म्हणाला, हार्दिकच्या कर्णधारपदाखाली पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला अपयश येणे पूर्णपणे ठीक आहे. हार्दिकला त्याची रणनीती मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अवलंबविण्यासाठी वेळ द्यायला हवा.

गंभीर म्हणाला, तज्ज्ञ काय म्हणत आहेत हे महत्त्वाचे नाही, बडबड करणे हे त्यांचे काम आहे. तुम्ही एखाद्याच्या कर्णधारपदाचे मूल्यांकन त्या संघाच्या कामगिरीवरून करायला हवे, हे माझे मत आहे. मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली असती, तर सर्वांनी त्याचे कौतुक केले असते. आज मुंबईने चांगली कामगिरी केली नाही आणि म्हणूनच प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे, असे गंभीर म्हणाला.

हार्दिक पंड्या दुसर्‍या फ्रँचायझीमधून आला आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याला वेळ द्या. गुजरात टायटन्सचा दोन वर्षे कर्णधार राहिल्यानंतर तो मुंबईत आला आणि त्याच्याकडून लगेच अपेक्षा करणे चुकीचे आहे. तो चांगली कामगिरी करू शकला असता. पण, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यात गैर काही नाही. त्याला थोडा वेळ द्या, असेही तो पुढे म्हणाला.

SCROLL FOR NEXT