Latest

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणारा गौरव पाटील अटकेत

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय नौदलाची गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव (पीआयओ) एजंट्सना पुरवून त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटील (23) याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करत आपल्या जाळ्यात ओढत पीआयओ एजंट्सनी गौरवकडून ही माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

ठाण्यामध्ये वास्तव्यास असलेला तरुण पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव (पीआयओ) एजंट्सच्या संपर्कात असून, तो या एजंट्सना गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने गौरव पाटीलवर नजर ठेवली होती. संशय बळावताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

एटीएसने केलेल्या चौकशीत गौरवची ही हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानचे दोन एजंट फेसबुक आणि वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गौरवच्या संपर्कात होते. गौरवने एप्रिल, मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या काळात फेसबुक व वॉटसअ‍ॅपवर चॅट करत त्यांना गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली. त्या बदल्यात या एजंटांकडून गौरवने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे एटीएसच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता

ठाणे परिसरात भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये गौरव एकटाच राहत असे. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. नौदलाच्या मुंबईतील डॉकयार्डमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले आणि तिथलीच गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटांना पुरवली.

चार जणांविरोधात गुन्हा दाखल

एटीएसने याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करुन गौरवला अटक केली आहे. गौरव हनी ट्रॅपमध्ये अडकला असावा, असे एटीएसला वाटते. पाकमधील किमान तिघांशी गौरवचा संपर्क असावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT