Latest

दिवे घाटात कचर्‍याची दुर्गंधी; वन्यजीव, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अमृता चौगुले

फुरसुंगी, पुढारी वृत्तसेवा: हडपसर-सासवड मार्गावरील दिवे घाटात मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यात वैद्यकीय कचर्‍याचे प्रमाण मोठे असल्याने स्थानिक रहिवाशांसह या भागातील वन्यजीवांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दिवेघाटाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.
दिवे घाटात सध्या ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे शनिवार व रविवारी सुटीच्या दिवसी पुणे शहरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

निसर्गरम्य दिवे घाट, वाहत्या पाण्याचे झरे, माथ्यावरून दिसणारा ऐतिहासिक मस्तानी तलाव, घाटमाथ्यावरील विठूरायाची भव्य मूर्ती आणि, घाटातील सेल्फी पॉईंट्स पर्यटकांना खुणावत आहेत. त्यामुळे घाटामध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, घाटातील वळणावर सध्या पोल्ट्री वेस्ट, खराब झालेली फळे, तरकारी, हॉटेलमधील कचरा, मृत कोंबड्या, टाकाऊ अंडी, नासलेली फळे, प्लास्टिक पिशव्या, मृत जनावरे, मुदतबाह्य औषधे, इंजेक्शन, रक्त-लघवीसाठी लागणारे सॅम्पल, वापरलेल्या सीरिंज बाटल्या, दारूच्या बाटल्या आदींचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या कचर्‍याभोवती मोकाट जनावरांचा वावर वाढून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या कचर्‍यामुळे परिसरातील वन्यजीवांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवे घाटातील तुटलेल्या कठड्यावरून कचरा फेकला जातो. त्यामुळे हा दिवेघाट आहे की कचराकुंडी, असा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित होत आहे.

प्रशासनाने तातडीने दिवेघाटाची स्वच्छता करावी, तुटलेले कठडे दुरुस्त करावेत, सुरक्षिततेसाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंग बसवावेत, तसेच कचरा टाकणार्‍यांवर गुन्हे नोंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख संदीप मोडक, वडकीचे माजी उपसरपंच सचिन मोडक, शादाब मुलानी, सागर मोडक यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे अभियंता अनिल गोरड यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद
दिला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT