पुणे : पुढारी वृत्तसेवा : बसण्यास जागा देण्यावरून इंजिनिअर तरूणाला रक्त येईपर्यंत गंभीर मारहाण करणार्या सात जणांच्या अज्ञात टोळक्यावर पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप सिद्राम गोंदगावे (37, रा. तळेगाव दाभाडे) याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 24) रोजी सकाळी सव्वा सात वाजता गोंदगावे मुंबई येथे जाण्यासाठी सिंहगड एक्सप्रेसमध्ये लोणावळा बोगीत चढले. त्यावेळी रेल्वतील एक प्रवासी व्यक्ती अगोदरच स्वतःच्या सीटबरोबरच अन्य दोन मोकळ्या सीट पकडून बसली होती. त्यावर फिर्यादी यांनी त्याला बसण्यास जागा देण्याची विनंती केली असता त्याने त्याला विरोध करत हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
तसेच मारहाण करत पुढे ढकलत नेत मारहाण केली. पुढे त्याच्या सहा साथीदारांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गोंदगावे यांच्या नाका तोंडातून रक्त येत होते. तसेच त्यांचा डोळाही टोळक्याने सुजवला. पुढे गोंदगावे सीएसटी स्टेशन येथे साडेदहाच्या सुमारास उतरले. तेथून उतरून ते पुन्हा पुण्यात एसटीने आले. पुणेस्टेशन येथे आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली असून सात जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेने प्रवास करताना प्रवासी एकटे असले तरी पुढे रेल्वेत चढणार्या आपल्या सहकारी मित्रांच्या जागा पकडून ठेवतात. पैसे भरून तिकीट काढूनही प्रवाशांना जागे पकडून धरल्यामुळे ताटकळत उभे रहावे लागते. जागा पकडण्यावरून वारंवार हुज्जत घालण्याचे प्रकार होत राहतात. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी तसेच जागा पकडणार्या अशा प्रवाशांची मक्तेदारी मोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने किंवा पोलिसांनी अशांना धडा शिकवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.