Latest

गडचिरोली : नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

निलेश पोतदार

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा सुरजागड लोहखाणीला समर्थन करीत असल्याचा ठपका ठेवून नक्षल्यांनी काल (ता.२३) रात्री एटापल्ली तालुक्यातील टिटोडा गावचे पोलिस पाटील लालसू वेळदा (वय ६०) यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

मृत लालसू वेळदा यांचा मुलगा अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियानाच्या सी-६० पथकात कार्यरत आहेत. काल (गुरूवार) रात्री शेकडो नक्षली टिटोडा गावात गेले. त्यांनी पोलिस पाटील लालसू वेळदा यांना गावाबाहेर नेऊन त्यांची मानेवर गोळी घालून हत्या केली. घटनास्थळी नक्षल्यांनी एक पत्रक टाकले आहे. सुरजागड लोहखाणीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असून, काही गावांतील पोलिस पाटील, गावपाटील, भूमीया, गायता ही मंडळी सुरजागड लोहखाणीचे समर्थन करीत आहेत. शिवाय ते आपल्या मुलांना तेथे नोकरीला लावत आहेत. लालसू वेळदा हेही त्यापैकीच एक होते, म्हणून त्यांची हत्या केल्याचे नक्षल्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

आज सकाळी जांभिया-आडंगे मार्गावर लालसू वेळदा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या प्रकरणी हेडरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्ली येथे आणण्यात आल्याची माहिती अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

आठवडाभरापूर्वी १५ नोव्हेंबरला नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथील दिनेश गावडे नामक युवकाची हत्या केली होती. त्यानंतर ही दुसरी हत्या आहे. कालच राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी येथे गेले होते. ते परत जाताच नक्षल्यांनी दुसरी हत्या केली आहे. या घटनांमुळे नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. मागील ३३ वर्षांत नक्षल्यांनी ३० हून अधिक पोलिस पाटलांची हत्या केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT