Latest

आमदार गडाखांचा विरोधकांना धोबीपछाड

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सत्तांतर होताच नेवाशातील 78 कोटीच्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली. आ. गडाखांनी प्रतिष्ठा पणाला लावत मंत्रीपदाच्या कार्यकाळात 78 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. राजकीय आकसातून देण्यात आलेली स्थगिती आ. शंकरराव गडाख यांनी न्यायालयीन लढा देत उठवली आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारला आ गडाखांनी न्यायालयीन लढ्यातून एकप्रकारे धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे. आ. गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्यातील 44 कामांसाठी 71 आणि अन्य 16 कामांसाठी 7 असा 78 कोटी रुपयांचा निधी बजेटमध्ये मंजूर करून घेतला. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. भाजप-शिंदे सरकारने राजकीय आकसातून नेवाशातील 78 कोटींच्या कामांना स्थगिती दिली.

राज्य सरकारच्या या अन्यायकारक स्थगिती विरोधात आ. गडाख यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात आव्हान देऊन दाद मागितली. आ.गडाख यांच्यावतीने कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, रमेश जंगले, ज्ञानेश्वर बोरुडे, बाळासाहेब सोनवणे, भगवान आगळे यांनी राज्य सरकारच्या असंवैधानिक निर्णयाविरोधात दाद मागून नेवासा तालुक्यातील विकास कामांना देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली.

मुख्य न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व आरिफ डॉक्टर यांच्यासमोर 4 ऑक्टोबरला सुनावणी झाली. शिंदे सरकारने 18 व 21 जुलै 2022 रोजी विकास कामांना स्थगिती देणारा पारित केलेला अध्यादेश खंडपीठाने रद्द केला. खंडपीठाच्या निकालानंतर नेवासा तालुक्यात जल्लोष करण्यात आला. स्थगिती उठल्यामुळे प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लागून लोकांची दळवळणाची सुरू असलेली गैरसोय दूर होणार आहे.

अपक्ष निवडून आल्यापासून आ गडाखांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची पाठराखण केल्याच्या राजकीय रोषातून शिंदे सरकारने त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंजूर कामांना स्थगिती देऊन तालुक्याच्या विकासात खोडा घालण्याचा घाणेरडा पायंडा शिंदे सरकारने पाडला. बजेट तसेच जिल्हा नियोजन मंडळातून नेवासा तालुक्याला एक रुपयाही मिळू दिलेला नाही. तालुक्यात निर्माण झालेल्या दुरावस्थेला राज्यातील सत्ताधारी तसेच तालुक्यातील त्यांचे बगलबच्चे जबाबदार आहेत. 78 कोटींच्या रस्ते कामांची स्थगिती उठली नसती तर परिस्थिती अधिकच विदारक बनली असती. निकालामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
                                                                     – अझर शेख, सरपंच, सलाबतपुर

या रस्त्यांची होणार कामे
सोनई ते मोरयाचिंचोरे, घोडेगाव ते मांडेगव्हाण, पानेगाव, हिंगोणी, कांगोणी, बर्‍हाणपुर, चांदा, माका ते महालक्ष्मी हिवरे, मडकी ते देवगड, गोपाळपुर ते खामगाव, जेऊर हैबती ते ताके वस्ती, खुपटी ते पुनतगाव, चिंचबन, भानसहिवरे मारुतीतळे ते औरंगाबाद महामार्ग, सलाबतपुर ते दिघी,भेंडा ते गेवराई, घोगरगाव जुने ते नवे घोगरगाव, वाकडी फाटा ते वाकडी, माळीचिंचोरे ते कारेगाव, माका ते वाघोली, मुकींदपुर ते मक्तापुर, शिंगवेतुकाई ते महामार्ग, उस्थळ दुमाला ते निपाणी निमगाव ही कामे मार्गी लागणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT