Latest

Bharat Mandapam : भव्यदिव्य ‘भारत मंडपम’बद्दल जाणून घेण्यासारख्या १६ गोष्टी(Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bharat Mandapam G20 Summit : राजधानी दिल्ली G-20 शिखर परिषदेच्या (g20 summit india) यजमानपदासाठी सज्ज झाली आहे. प्रगती मैदानावर 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान  G-20 परिषद पार पडणार आहे. अनेक देशांचे दिग्‍गज नेते या परिषदेनिमित्त भारतात येणार आहेत. भारताने या परिषदेची थीम "वसुधैव कुटुंबकम म्हणजेच "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ठेवली असून त्यासाठी दिल्लीला वधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.

भारत मंडपममध्ये आयोजन (Bharat Mandapam)

दिल्लीच्या प्रगती मैदानावरील IECC कन्व्हेन्शन सेंटरमधील भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. भारत मंडपम (Bharat Mandapam) बनवण्यासाठी सुमारे 2,700 कोटी रुपये खर्च आला असून, त्याची भव्यदिव्य अशी उभारणी करण्यात आली आहे. 26 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपमचे उद्घाटन केले.

भारत मंडपम हे देशातील सर्वात मोठे अधिवेशन केंद्र

भारत मंडपम हे देशातील सर्वात मोठे अधिवेशन केंद्र ठरले आहे. त्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींनी भारत मंडपम (Bharat Mandapam PM Modi) असे नाव देण्यामागचे कारणही सांगितले होते. हे नाव भगवान बसवेश्वरांच्या 'अनुभव मंडपम' पासून प्रेरित आहे. पीएम मोदी म्हणाले होते की, 'अनुभव मंडपम म्हणजे वादविवाद आणि संवादाची लोकशाही पद्धत. अनुभव मंडपम म्हणजे अभिव्यक्ती. भारत ही लोकशाहीची जननी आहे हे आज जग मान्य करत आहे.'

'भारताची विविधता जगासमोर प्रदर्शित'

वास्तुविशारद संजय सिंह यांनी सांगितले की, 'भारत मंडपमची रचना 'दिल्लीची खिडकी' म्हणून करण्यात आली आहे. या वास्तूच्या माध्यमातून भारताची विविधता जगासमोर प्रदर्शित होते. कन्व्हेन्शन सेंटरची निर्मिती मूळ भारतीय संस्कृती आणि विविधतेच्या पायावर आधारलेली असावी, पण त्यात आधुनिकता झळकावी, असा एका ओळीचा संदेश मला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाला होता.'

भारत मंडपम किती भव्य आहे? (Bharat Mandapam)

1. प्रगती मैदानाच्या पुनर्विकासाचे काम 2017 मध्ये सुरू झाले. राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत त्याचा विकास करण्यात आला आहे. यासाठी 2,700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

2. भारत मंडपमच्या (Bharat Mandapam) प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक खोलीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृती आणि परंपरेची छाप दिसते.

3 .हे संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर 123 एकरात पसरले आहे. हे क्षेत्र जवळपास 26 फुटबॉल स्टेडियमच्या बरोबरीचे आहे.

4. त्यात सात नवीन प्रदर्शन सभागृहे बांधण्यात आली आहेत. तिसर्‍या मजल्यावर एक मोठा हॉल आहे, ज्यामध्ये सात हजार लोक एकत्र बसू शकतात. त्यामुळे भारत मंडपम हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे आहे.

5. याशिवाय भारत मंडपममध्ये तीन ओपन अॅम्फी थिएटरही बांधण्यात आले आहेत. या अॅम्फी थिएटरमध्ये एकावेळी तीन हजार लोक बसू शकतात.

जगातील सर्वात उंच नटराजाची मूर्ती

6. भव्य भारत मंडपमसमोर 28 फूट उंच जगातील सर्वात उंच नटराजाची मूर्तीही उभी करण्यात आली आहे.

7. IECC कन्व्हेन्शन सेंटर 2700 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. केवळ भारत मंडपमवर 750 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

8. भारत मंडपम हे ल्युटियन्स दिल्लीला लागून आहे. यात सर्वात वरच्या बाजूला 'विंडो टू दिल्ली' हे स्थळ बनवण्यात आले आहे. येथून कर्तव कर्तव्य पथ, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दिसते.

9. तीन मजल्यांमध्ये बांधण्यात आलेला भारत मंडपमला सभा, संमेलन आणि प्रदर्शनासाठी तयार करण्यात आला आहे. यात एक व्हीआयपी कक्षही आहे, जो पंतप्रधानांसाठी बांधण्यात आला आहे.

10. पहिल्या मजल्यावर 18 खोल्या आहेत, ज्या सामान्यतः कॉन्फरन्ससाठी वापरल्या जातील. व्हीआयपी विश्रामगृहेही बांधण्यात आली आहेत.

11. दुसऱ्या मजल्यावर दोन मोठे हॉल तयार करण्यात आले आहेत. एक शिखर कक्षही बांधण्यात आला आहे. यासह, या मजल्यावर एक मोठा लाउंज क्षेत्र देखील आहे, ज्याचा वापर आवश्यक असल्यास शिखर कक्ष म्हणून केला जाऊ शकतो.

12. तिसऱ्या आणि शेवटच्या मजल्यावर एक मोठा हॉल आहे. त्यात चार हजार लोक बसू शकतात. त्यामुळे खुले अॅम्फी थिएटर करण्यात आले असून, त्यात तीन हजार लोक बसू शकतील. अशा प्रकारे या सभागृहात एकावेळी सात हजार लोक बसू शकतात.

13. भारत मंडपममध्ये काश्मीर आणि भदोही (यूपी) येथील कारागिरांनी हाताने बनवलेले गालिचे टाकण्यात आले आहेत. ज्या हॉलमध्ये जी-20 शिखर परिषद होणार आहे त्या सभागृहात काश्मिरी गालिचे विखुरले आहेत. बाहेर भदोही गालिचे आहेत.

14. याशिवाय येथे पार्किंगसाठीही मोठी जागा आहे. येथे एकावेळी पाच हजार वाहने उभी करता येतील. यापैकी चार हजार वाहने भूमिगत पार्किंगमध्ये उभी करता येणार आहेत.

15. या इमारतीची रचना 'शंख'च्या आकारात करण्यात आली आहे. त्याच्या भिंतींवरही भारतीय संस्कृती दिसते. भिंतींवर योगमुद्रा कोरलेल्या आहेत. अनेक भिंतींवर तंजोर चित्रे आणि मधुबनी कलाकुसर करून परिसर आकर्षक बनवण्यात आला आहे.

16. येथे 116 देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे प्रतीक 'सूर्य द्वार' आहे. 'फ्रॉम झिरो टू इस्रो' हे 'प्रगती चक्र' भारतीय अंतराळ विज्ञानाची कहाणी आहे. 'आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी' ही पंचभूते आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT