Latest

G20 Summit : २०० तास चर्चा, ३०० बैठका १५ मसुद्यांनंतर अंतिम मसुदा

मोहन कारंडे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जी-२० परिषदेपूर्वी आदल्या दिवशी शनिवारी दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्‍या सत्राला संबोधित करत होते. यादरम्यान, आताच एक खूशखबर आली आहे. आमच्या चमूची नवी दिल्ली जाहीरनाम्याबाबत अंतिम सहमती झालेली आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या चमूचा उल्लेख केला, तीत 'जी- २०' चे शेरपा अमिताभ कांत यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी याबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे.

युक्रेन युद्ध ठरले जटिल बाब

२०० तास नॉनस्टॉप चर्चा चालली. ३०० द्विपक्षीय बैठका झाल्या. पंधरा मसुदे तयार झाले. नंतर कुठे युक्रेन युद्धाच्या बाबतीत सर्वसंमती तयार होऊ शकली, असे जी २० परिषदेचे शेरपा (कांत) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नमूद केले आहे. नागराज नायडू आणि ईनम गंभीर या अधिकार्‍यांची मोलाची साथ लाभल्याचेही कांत यांनी नमूद केले आहे.

सर्व ८३ परिच्छेद सर्वसंमतीने

आम्ही जी – २० चे अध्यक्ष म्हणून भूमिका सुरू केली तेव्हा पंतप्रधान मोदींनी बजावले होते की, सर्व देशांना सोबत आणण्याच्या भारतीय धोरणांना धक्का लागता कामा नये. विशेष म्हणजे अंतिम मसुद्यांतर्गत सर्व ८३ परिच्छेद सर्वसंमतीने स्वीकृत झाले.

ग्रह (पृथ्वी), लोक, शांतता, समृद्धी शीर्षकांतर्गत ८ परिच्छेद भूराजकीय विषयांशी निगडित आहेत. या सर्वांवरही सर्व सदस्य देशांनी संमती दर्शविली आहे. आक्षेप घेणार्‍या एखाद्या तळटिपेशिवाय दिल्ली जाहीरनामा १०० टक्के सर्वसंमतीने मंजूर झालेला आहे. भारत जगज्जेता बनल्याचेच हे द्योतक आहे.

तथापि, या जाहीरनाम्यावर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, आम्ही परिषदेत सहभागी असतो, तर सत्यस्थिती लोकांना अधिक प्रकर्षाने कळली असती, अशी प्रतिक्रिया तेवढी आलेली आहे. या प्रतिक्रियेतही हरकत म्हणावे, असे काही नाही. सबब… आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्ली जाहीरनामा हा सर्वसंमतीचा जाहीरनामाच मानला जात आहे.

यापूर्वीच्या जी-२० मध्ये चीन, रशियाकडून हरकती

नोव्हेंबर २०२० मध्ये इंडोनेशियात झालेल्या जी २० परिषदेतील अंतिम जाहीरनाम्यात रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातील घोषणेवर सर्वसंमती नव्हती झाली. रशिया आणि चीनने स्वत:ला या घोषणेपासून वेगळे करून घेतले होते. लेखी स्वरूपात हरकतही नोंदविली होती.

जी-२० शेरपा कोण? शेरपाची भूमिका काय?

  • सर्व सदस्य देशांचे शेरपा आपापल्या देशात आयोजित परिषदेदरम्यान आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. एडमंड हिलेरी यांना माऊंट एव्हरेस्ट गाठण्यात शेरपा तेनसिंग यांनी जशी मोलाची भूमिका बजावली, तसेच आपापल्या देशांच्या नेत्यांना मदत करणे, ही जी-20 मध्ये शेरपांची भूमिका असते.
  • 'शेरपा' आपल्या देशाच्या ध्येयधोरणांबाबत इतर देशांना अवगत करतात.
    'शेरपा' हे पद एखाद्या राजदूताच्या समकक्ष असते. शेरपाची निवड सदस्य देशांतील सरकारकडून केली जाते.
  • जी – २० शिखर संमेलन असो वा अन्य कार्यकारी समूहांच्या बैठका, सर्वांचे नियोजन सदस्य देशांचे शेरपा करतात.
  • कार्यक्रमादरम्यान यजमान आणि विदेशी पाहुण्यांतील समन्वयाचे कामही शेरपांना बघावे लागते.
  • दिग्गज नेत्यांदरम्यानच्या बैठकांपूर्वी सदस्य देशांचे शेरपा आपसांत चर्चा करतात. बहुतांशी या पातळीवरच सहमती व असहमती निस्तरून घेतली जाते. नेत्यांनी सह्या करणे तेवढे बाकी राहायला हवे, असे शेरपांकडून पाहिले जाते.
SCROLL FOR NEXT