Latest

G20 Summit 2023 : विश्वगुरू भारत

Arun Patil

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'वसुधैव कुटुंबकम'चा मंत्र घेऊन भारत दमदारपणे जगासमोर आला असून विकसनशील देशाकडून विकसित देश बनण्याच्या भारताच्या पावलांची जगाने जी-20 परिषदेच्या माध्यमातून दखल घेतली. या परिषदेत युक्रेनसह सर्व महत्त्वाच्या विषयांवर जगातील शक्तिशाली देशांची सहमती घडवून आणल्याने 'विश्वगुरू' म्हणून भारताचे नेतृत्व जगाने मान्य केले असून भारताने जगाच्या नव्या नेतृत्वाची धुरा सांभाळली असल्याचे या परिषदेच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

सार्‍या जगाचे लक्ष असलेली जी-20 शिखर परिषद यशस्वी करून भारताने सार्‍या जगावर आपल्या नेतृत्वाची अमिट छाप सोडली. समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच 'स्वस्ति अस्तु विश्वस्य' या विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना केली.

जगाची 85 टक्के अर्थव्यवस्था आणि निम्म्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या 'जी-20' या जगातील 20 शक्तिशाली देशांच्या शिखर परिषदेचे आयोजन करीत आणि जवळपास सर्वच विषयांवर पुढाकार घेत आग्रही भूमिका मांडणार्‍या भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद यशस्वी करून दाखवली. संघर्षाचे कारण ठरणार्‍या अनेक विषयांवर भारताच्या

समंजस आणि प्रभावी मध्यममार्गी भूमिकेमुळे कोणतेही गालबोट न लागता ही परिषद कमालीची यशस्वी झाली. अन्नसुरक्षा, एआय व डिजिटल क्रांती, हरित ऊर्जा, वातावरण बदल यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर या दोन दिवसीय परिषदेत विचारमंथन झाले आणि युक्रेन संघर्षासह सर्व विषयांवर सर्वसहमतीचे घोषणापत्र तयार करीत भारताने जगाला रोडमॅप तयार करून दिला.

जी-20 परिषदेचा रविवारी दुसरा आणि अंतिम दिवस होता. नियोजनाप्रमाणे आज वन फ्यूचर (एक भविष्य) या विषयावर सत्र झाले. याआधीची वन अर्थ (एक पृथ्वी) आणि वन फॅमिली (एक कुटुंब) या विषयांवरील दोन सत्रे शनिवारी झाली होती. आफ्रिकी समूहाला 'जी-20'चे मिळालेले सदस्यत्व आणि नवी दिल्ली संयुक्त जाहीरनामाही जागतिक पातळीवरील सर्व नेत्यांनी एकमताने स्वीकारणे ही पहिल्या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांची सोबत आणि सर्वांचा विकास या मूलमंत्राने पुढे जाण्याचे आवाहन केले होते.

नोव्हेंबरमध्ये आभासी बैठक

समारोप सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जी-20'चे पुढील अध्यक्षपद तांत्रिक स्वरूपात ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडे हस्तांतरित केले. अर्थात ब्राझीलच्या अध्यक्षीय जबाबदारीला एक डिसेंबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जी-20 चे अध्यक्षपद भारताकडेच राहणार आहे. या अखेरच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जी-20 चे आभासी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला. ते म्हणाले,

नोव्हेंबर अखेरपर्यंत जी-20च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. दोन दिवस चाललेल्या परिषदेमध्ये अनेक सूचना आणि प्रस्ताव समोर आले. त्यामुळे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रक्रिया गतिमान कशी होईल हे पाहायला हवे. यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस जी-20 शिखर परिषदेचे एक आभासी सत्र बोलावून याबाबतचा आढावा घेतला जावा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली. तसेच 'स्वस्ति अस्तु विश्वस्य' या विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना करणार्‍या संस्कृत वचनाने परिषदेचा समारोप केला.

भूक व दारिद्य्र याविरुद्ध आघाडी

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा प्राधान्यक्रम सांगितला. भूक आणि दारिद्य्र याविरुद्ध वैश्विक आघाडी तयार करणे, त्याचप्रमाणे पर्यावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणण्यासाठी दोन कृती गट तयार करण्यात येतील, असेही ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या समाधी स्थळाच्या दर्शनाचा उल्लेख करताना ते भावूकही झाले होते. राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी आपल्या राजकीय जीवनात महात्मा गांधींच्या आदर्शांना महत्त्व दिल्याचे सांगितले. अनेक दशके कामगार चळवळीत संघर्ष करताना आपण नेहमीच अहिंसेचे पालन केले आहे. त्यामुळे महात्मा गांधींना आदरांजली वाहताना भावूक झाल्याचे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT