Latest

G-20 द़ृष्टिक्षेपात.. : 9 महिन्यांत 60 शहरांत 220 बैठका

Arun Patil

गेल्यावर्षी 1 डिसेंबर रोजी भारताला या परिषदेचे यजमानपद मिळाले. भारताला यजमानपद मिळाल्यानंतर देशातील 60 शहरांमध्ये G-20 च्या 220 बैठका पार पडल्या आहेत. विविध विषयांवर मंत्री परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. उद्या G-20 ची शिखर परिषद होणार आहे. दरम्यान, या शिखर परिषदेनंतर पुढील वर्षी 2024 मध्ये G-20 च्या यजमानपदाचा मान ब्राझीलला मिळणार आहे. त्यानंतर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ही परिषद आयोजित केली जाणार आहे.

15 राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 समूहातील 15 देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्यासह बांगलादेश, मॉरिशस, इटली, जपान, जर्मन, फ्रान्स, कॅनडा, तुर्की, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात, नायजेरिया, ब्राझील, युरोपियन युनियन आदी देशांच्या प्रमुखांसोबत मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी उपाययोजना करणार

रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद या परिषदेवर असणार आहे. या युद्धामुळे इंधनासह ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. जगभरातच याची झळ पोहोचली आहे. त्यामुळे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्जावरील आणि कर्जाच्या व्याजावरील दरात सवलत मिळावी, यासाठी या परिषदेतून ठराव मांडण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांनीही जी-20 परिषदेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांनाही कोव्हिड आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेबाबत कल्पना आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्याज दर आणि अर्थपुरवठ्याबाबत काही सकारात्मक पावले उचलली आहेत, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

परिषदेसाठी 4254 कोटी खर्च

सुरक्षा, रस्ता, फूटपाथ, वीज आदींसह विविध क्षेत्रांत केंद्र सरकारने 4,254 कोटी रुपये खर्च केले आहेत. विमानतळ, हॉटेल, भारत मंडपमसह महत्त्वाच्या ठिकाणी जी-20 थिमचे रंग वापरले आहेत. भारत व्यापार संवर्धन संघटना (3600 कोटी), दिल्ली पोलिस (340 कोटी), दिल्ली नगरपालिका (60 कोटी), दिल्ली लोकनिर्माण विभाग (45 कोटी), केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक (26 कोटी), दिल्ली विकास प्राधिकरण (18 कोटी), वन विभाग (16 कोटी), दिल्ली नगर निगम (5 कोटी) या विविध खात्यांतर्फे हा निधी खर्च करण्यात आला आहे.

प्रदर्शनामधून डिजिटल इंडियाला चालना

येथील कॉरिडॉरमध्ये 'मेक इन इंडिया'ला चालना देणारे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. डिजिटल इंडियावर फोकस करण्यात येणार असून भारतीय तंत्रज्ञान आणि संशोधनाचे जोरदार विपणन या ठिकाणी करण्यात येणार आहे.

300 रेल्वे गाड्यांवर परिणाम

दीर्घ पल्ल्याच्या रेल्वेसेवेवर होणार आहे. मात्र जवळच्या मार्गावरील सेवा परिषदेच्या काळात बंद करण्यात येणार आहेत. जवळपास 40 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. ताज एक्स्प्रेस, निजामुद्दीन, आनंद विहार, सराह रोहिल्ला, नवी दिल्ली, जुनी दिल्ली आदी रेल्वे स्थानकांवर पार्सल आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे. 208 प्रवासी आणि 129 मालवाहू रेल्वे गाड्यांच्या सेवा खंडित होणार आहेत. निजामुद्दीन-साहिबाबाद, निजामुद्दीन गाझियाबाद या रेल्वेसह अन्य रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

नटराजाची मुर्ती 1000 वर्ष टिकणार

तामिळनाडूतील तिघा कारागीर बंधूंनी भगवान शंकराचे प्रतिबिंब असणार्‍या नटराजाची भव्य मूर्ती बनविली आहे. या मूर्तीची उंची 28 फूट असून विविध आठ धातूंपासून ही मूर्ती बनविण्यात आली आहे. या मूर्तीचे वजन साधारण 20 टन आहे. एक हजार वर्षांपर्यंत ही मूर्ती टिकेल, असे सांगण्यात येते.

पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी नेत्र विमानाद्वारे टेहळणी

पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी नेत्र नामक एआयए विमान तैनात करण्यात येणार आहे. 'नेत्र'द्वारे संशयास्पद हालचाली टिपण्यात येणार आहे. भारतीय संरक्षण संशोधन विभागाने नेत्र एअरक्राफ्टची निर्मिती केली आहे. फेब्रुवारी 2019 साली झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्यातील पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची टेहळणी करण्यासाठीही नेत्र या विमानांचा वापर करण्यात आला होता. भारत मंडपमसह संवेदनशील ठिकाणी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संशयास्पद कृत्य आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. भारत मंडपसह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई दल (आयएफ), राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी),केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पाहुण्यांचे स्वागत एआय गीता करणार

डिजिटल इंडियाअंतर्गत 2014 पासून भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या प्रारूपाचे सादरीकरण प्रदर्शनादरम्यान केले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येही (एआय) भारताने आघाडी घेतली आहे. जी-20 पाहुण्यांचे स्वागत गीता नामक एआय (अ‍ॅप)द्वारे करण्यात येणार आहे. या अ‍ॅपला परिषदेसंदर्भात प्रश्न विचारल्यास पाहुण्यांना त्याचे अचूक उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे पाहुण्यांची गैरसोय टाळली जाणार आहे. श्रीमद्भगवद्गीतेवरून या एआय अ‍ॅपला गीता असे नाव देण्यात आले आहे.

या अ‍ॅपमुळे पाहुण्यांना एकाच छताखाली सर्व सुविधांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ डुइंग बिझनेस, इज ऑफ गव्हर्नन्स या त्रयींचा संगम या अ‍ॅपमध्ये अनुभवण्यास मिळणार आहे. हॉल क्रमांक 4 आणि 14 मध्ये हे अ‍ॅप पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठेवले आहे. पाहुण्यांच्या प्रश्नांना हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीमधून उत्तर देणार आहे. भगवद्गीतेतील भाषेचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे श्लोकाच्या माध्यमातूनही उत्तरे मिळणार आहेत. तंत्रज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT