Latest

बटाट्याच्या दरात आणखी घसरण ; उत्पादक शेतकरी नाराज

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बटाटा काढणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र, बटाट्याच्या दरात आणखी घसरण झाल्याने बटाटा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रांजणी, नागापूर, थोरांदळे आदी परिसरात बटाटा काढणीची कामे आता वेगात सुरू झाली आहेत. बटाटा पिकाला अनुकूल हवामान मिळालेच नाही. लागवडीनंतर पावसाने मारलेली दडी, पाणीटंचाई, त्यानंतर ऑक्टोबर हिट यामुळे करपा, लाल कोळी रोगांचा प्रादुर्भाव बटाट्यावर झाला आणि त्याचा परिणाम गळितावर झाला.

गळितामध्ये निम्म्याहून अधिक घट झाली. सुरुवातीला बटाटा पिकाला 10 किलोला 180 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. परंतु त्यानंतर बाजारभावात मात्र घसरण झाली. दिवाळीनंतर बाजारभावात वाढ होण्याची आशा शेतकर्‍यांना होती. परंतु बाजारभावात आणखी घसरण झाली. सध्या बटाट्याला 10 किलोला 140 ते 150 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.

यंदा बटाटा पिकाला अनुकूल हवामान मिळालेच नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाली. बाजारभाव चांगला मिळेल ही शेतकर्‍यांची आशा सपशेल फोल ठरली. आता बाजारभावात आणखी घसरण होत चालल्याने गुंतवलेले भांडवल वसूल होणार नाही.
                                             -विशाल मिंडे, बटाटा उत्पादक शेतकरी, नागापूर

SCROLL FOR NEXT