Latest

टेंभुच्या वंचित गावांच्या कामाला निधी द्या अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन : डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा

backup backup

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेच्या वंचित गावांच्या कामांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी द्या आणि तात्काळ कामे सुरू करा.अन्यथा विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल आणि समन्यायी पाणी चळवळीच्या वतीने लिंगीवरे येथे आयोजित पाणीपरिषदेत डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

लिंगीवरे ता. आटपाडी येथील धुळाजी झिंबल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते.क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, इंदूताई पाटणकर,भाई गणपतराव देशमुख,धुळा झिंबल आणि दिवंगतांना अभिवादन करुन पाणीपरिषद सुरू झाली.आनंदराव पाटील, साहेबराव चवरे,जनार्दन झिंबल,विजयसिंह पाटील,महादेव देशमुख,हणमंतरावदेशमुख, दादासाहेब पाटील,मनोहर विभूते, सादिक खाटिक,दत्तात्रय यमगर,नानासो मोटे, नंदकुमार इनामदार दादासाहेब हुबाले उपस्थित होते.

डॉ.भारत पाटणकर म्हणाले,आटपाडी तालुक्यातील टेंभुच्या पाण्यापासून वंचीत बारा गावांचा २०१९ मध्ये योजनेत समावेश झाला.नव्याने काही जणांनी सुधारीत प्रशासकीय मान्यता झाल्याच्या उद्घोषणा केल्या.ही मान्यता आत्ता मिळाली आहे.

ते म्हणाले वंचीत गावांचा टेंभू सहाव्या टप्या अंतर्गत योजनेत समावेश करण्यात आला. त्याचा सर्वे गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आला आहे. आता या गावांना निधी देण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही.त्यामुळे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यता घेऊन आगामी अधिवेशनात निधीची तरतूद केली जावी.

बंदिस्त पाइपलाइनची कामे प्रलंबित आहेत.शेवटची आऊटलेटची वितरण व्यवस्था अद्याप तयार झालेली नाही. फेब्रुवारी अखेर पाइपलाइनचे शेवटच्या टोकापर्यंतचे जाळे पूर्ण केले जावे. आटपाडी कालव्यावरील दिघंचीकडील कामे प्रलंबित आहेत.या कामांची तातडीने पूर्तता करावी अन्यथा मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

आनंदराव पाटील म्हणाले की श्रमिक आणि चळवळीच्या रेट्यामुळेच टेंभू योजनेचे ८५ टक्के पाणी मिळाले आहे. पहाटेचा शपथविधी व प्रवेश सोहळा घेण्यास वेळ आहे. मात्र दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास वेळ नाही अशी टीका करत राज्य शासनाचा जाहीर निषेध केला.

ते म्हणाले राज्यशासनाने लवकर निधी मंजूर करावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ही पाटील यांनी दिला. राजेवाडी तलाव हा सांगली पाटबंधारे विभागाला जोडावा तरच राजेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते.मात्र उरमोडीकडे पाणी शिल्लक नाही व जिहे कटापूर योजना आठ महिन्यांची आहे त्यामुळे ती योजना फसवी असल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले.

राजेवाडी तलावात जिहे कटापूर योजनेतून आणले जाणारे पाणी हे नदीच्या पुराचे आहे.ते आठमाही आहे.राजेवाडीत या योजनेतून येणारे पाणी फक्त माण खटाव तालुक्यातील गावांसाठी राखीव आहे.ते साठवण एरियात येईपर्यंत अनेक वर्षे लागतील.या पाण्याच्या मागे धावण्यापेक्षा टेंभू योजनेत समावेश झालेल्या वंचित गावांना बंदिस्त पाईपलाईनने थेट शेतात पाणी मिळणार आहे.या योजनेसाठी फक्त निधी पाहिजे. त्यासाठी राजेवाडी लिंगीवरे आणि वंचित गावातील शेतकऱ्यांनी लढा उभारला पाहीजे.पाणी संघर्ष चळवळ या लढ्याचे नेतृत्व करणार असल्याने या लढ्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी वेळ पडल्यास मुंबईला जायचा निर्धार करावा असेही डॉ.पाटणकर म्हणाले.

SCROLL FOR NEXT