Latest

IPL 2023 : आयपीएलला दुखापतीचे ग्रहण

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 16व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे तीन दिवस बाकी आहेत. मात्र ही स्पर्धा (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी अनेक स्टार क्रिकेटर्स दुखापतीमुळे लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीत.

या दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जॉनी बेअरस्टो, काईल जेम्सन, विल जॅक्स, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लोकी फर्ग्युसन, मुकेश चौधरीसारख्या क्रिकेटपटूंच्या सहभागाबद्दल देखील साशंकता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज हे क्रिकेटपटूंच्या दुखापतीने सर्वाधिक प्रभावित झालेले संघ आहेत; तर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेता गुजरात टायटन्स हे एकमेव संघ आहेत, ज्यांना आतापर्यंत दुखापतींचा फटका बसलेला नाही.

यावेळी लीगवर दुखापतींचे सावट दिसत आहे. या दुखापतींमुळे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना त्यांचे कर्णधार बदलावे लागले. या हंगामात पंतच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आहे. त्याचबरोबर कोलकाताने श्रेयसच्या जागी नितीश राणाला कर्णधारपदी नियुक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्याच्या खेळाण्याबाबत साशंकता आहे. यामुळेच केकेआरने राणाला कर्णधार म्हणून निवडले आहे. कोलकाताकडून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनलाही दुखापतीमुळे स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (IPL 2023)

आरसीबीसाठी गेल्या हंगामात 152.75 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा करणारा रजत पाटीदार आणि त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्या सहभागाबद्दलही साशंकता आहे. पाटीदारवर टाचेच्या दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरू आहेत, तर हेझलवूड दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. गेल्या हंगामात सर्वात जलद शतक झळकावणारा पाटीदार दुखापतीतून सावरत असल्याचे म्हटले जात आहे. पण अर्ध्या स्पर्धेत तो बाहेर राहू शकतो.

आरसीबीकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज विल जॅकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या मोसमात सीएसकेसाठी 13 सामन्यांत 16 विकेट घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी देखील एनसीएमध्ये पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. या हंगामात तो कधी उपलब्ध होईल हे निश्चित नाही. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन याची माघार हा सीएसकेसाठी मोठा धक्का आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मगालाला संधी देण्यात आली आहे.

गेल्यावेळी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यावेळी जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. लखनौ सुपरजायंटस्ला आशा आहे की, मोहसिन त्यांच्यासाठी स्पर्धेच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. पंजाब किंग्जकडून गेल्या वेळी 253 धावा करणारा जॉनी बेअरस्टोही या लीगमध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी बिग बॅशमध्ये धमाकेदार कामगिरी करणार्‍या मॅथ्यू शॉर्टला घेण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरलेला जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन हे दोघेही जखमी झाले आहेत. बुमराह न खेळणे हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा मुंबईसाठी दिलासादायक बाब आहे. आर्चर यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये खेळला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT