Latest

मत्स्याहारातील ‘या’ चार संयुगांमुळे घटते कोलेस्टेरॉल

Arun Patil

लंडन : मत्स्याहार हा अनेक बाबतीत आरोग्यासाठी लाभदायक ठरत असतो. 'फॅटी फिश' म्हणून ओळखल्या जाणार्‍या साल्मन, टुनासारख्या काही माशांमध्ये 'ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड' असते. त्याचा उपयोग विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी होत असतो. मात्र, आता एका नव्या संशोधनात आढळले आहे की माशांमधील चार विशिष्ट संयुगांचा उपयोग हानिकारक कोलेस्टेरॉल घटवण्यासाठीही होतो. विशेषतः साल्मनसारख्या माशाच्या सेवनाने आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तीस लाभ होऊ शकतात!

जगभरातील अनेक आहारतज्ज्ञांनी वेळोवेळी मत्स्याहाराचा व त्यामध्येही साल्मन मासे खाण्याचा सल्ला दिलेला आहे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच आजारांना दूर ठेवण्यासाठी हे लाभदायक ठरत असते. आता कोलोरॅडो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या माशातील चार विशिष्ट संयुगांचा अभ्यास केला आहे जे अत्यंत आरोग्यदायी ठरत असतात. त्यांनी या चार संयुगांचा छडा लावला आहे जे बॅड कोलेस्टेरॉल घटवण्यास मदत करतात.

या संशोधनाची माहिती 'जर्नल ऑफ न्युट्रिशन' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की केवळ हा मासा खाल्ल्याने आरोग्याला तब्बल तीस प्रकारे लाभ मिळतात. त्यापैकी चार लाभ हे थेट हृदयाशी संबंधित आहेत. त्यांनी याबाबतची पाहणी काही लोकांवर केली आणि त्यांना मिळालेल्या अशा लाभाचाही अभ्यास केला.

SCROLL FOR NEXT