Latest

रहस्‍य : कल्पिताहून सत्य अद्भुत

Arun Patil

विमान अपघातानंतर अ‍ॅमेझॉनच्या जंगलात हरवलेली चार मुलं चाळीस दिवसांनंतर सुरक्षित, जिवंत सापडली. या मुलांच्या जगण्याच्या संघर्षाची नोंद आता इतिहासाने घेतली आहे. त्यांच्या संघर्षावर भविष्यात अनेक पुस्तके, टी.व्ही. मालिका किंवा चित्रपटही येतील. एखाद्या काल्पनिक कथेपेक्षाही त्यांची कथा अधिक रोमांचकारी आहे.

'सत्य हे कल्पनेपेक्षाही आश्चर्यकारक असतं,' असं म्हटलं जातं. कोलंबियात घनदाट अ‍ॅमेझॉनच्या जंगलात एका विमान अपघातानंतर आईला गमावलेल्या चार लहानग्यांनी तब्बल 40 दिवस जगण्याचा जो संघर्ष केला तो पाहता या विधानाची प्रचिती सहज येऊ शकते! 13, 9, 4 वर्षे वयाची कोवळी मुलं अवघ्या एक वर्षाच्या बाळासह अ‍ॅमेझॉनसारख्या घनदाट जंगलात रात्रंदिवस कशी राहिली असतील, याची कल्पना करणेही कठीण आहे! मात्र, ही मुलं जगण्याचा संघर्ष करीत राहिली आणि सुदैवाने ती सापडलीही! या मुलांच्या 40 दिवसांच्या जगण्याच्या संघर्षावर भविष्यात जगभरात अनेक पुस्तके, टी.व्ही. मालिका किंवा चित्रपटही येतील. एखाद्या काल्पनिक कथेपेक्षाही त्यांची ही कथा अधिक रोमांचकारी आहे!

एक इंजिन असलेले 'सेस्ना 206' नावाचे छोटे विमान तीन प्रौढ आणि चार लहानग्यांना घेऊन अरराकुआरा येथून सॅन जोस डेल ग्वावियारे या शहराकडे निघाले होते. वाटेत ते अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलावरून उडत होते. या तीन प्रौढांमध्ये चार मुलांसह प्रवास करणारी मॅग्दालेना म्युक्युटी व्हॅलेन्सिया, पायलट हर्नेंडो म्युर्सिया मोरालेस आणि हर्मन मेंडोझा हर्नांडेझ हा एका स्थानिक आदिवासी समुदायाचा नेता यांचा समावेश होता. अचानक या विमानाचे एकमेव इंजिन बंद पडले आणि पायलटने इमर्जन्सी घोषित केली. त्यानंतर थोड्याच वेळात हे विमान रडारच्या बाहेर गेले.

'पृथ्वीचे फुफ्फुस' असे म्हटल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉनच्या जंगलात हे विमान कोसळले. जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन नदीच्या खोर्‍यात 55 लाख चौरस किलोमीटरच्या विस्तृत जागेत हे भले मोठे वर्षावन पसरलेले आहे. तब्बल नऊ देशांच्या हद्दीत या जंगलाचे वेगवेगळे भाग येतात. त्यापैकी सर्वात मोठा म्हणजेच 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. कोलंबियामध्ये या जंगलाचा दहा टक्के भाग येतो. अशा घनदाट जंगलात 1 मे रोजी हे विमान कोसळले आणि विमानातील सर्व प्रौढ मृत्युमुखी पडले. उरली ही कोवळ्या वयाची चार मुलं.

या भीषण अपघातात हे चार जीव बचावले, हाच पहिला चमत्कार होता. त्यामध्ये लेस्ली जेकोबोम्बैरे म्युक्युटी (वय 13) ही मुलगी व तिचे तीन धाकटे भाऊ सोलेक्नी रॅनोकी म्युक्युटी (9), तिएन नोरील रॅनोकी म्युक्युटी (4) आणि क्रिस्टीयन नेरीमन रॅनोकी म्युक्युटी हे जेमतेम एक वर्षाचे बाळ यांचा समावेश होता. अपघातानंतर चार दिवस या चार मुलांची आई जिवंत होती व मृत्यूशी झुंज देत होती. तिने आपल्या मुलांना, विशेषतः थोरल्या कन्येला सांगितले की, मला सोडा आणि तुमचा जीव वाचवा! अपघातानंतर चार दिवसांनी या माऊलीने आपल्या चार मुलांना जणू काही वनदेवतांच्या हवाली करून प्राण सोडले! जग्वारसारखी अनेक हिंस्र श्वापदे, विषारी साप, मलेरिया फैलावणारे डास अशा संकटांनी भरलेल्या या जंगलात ही आईविना पोरकी झालेली चार मुलं एकाकी अवस्थेत अडकली होती. मात्र, त्यांनी धीर न सोडता जंगलातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करण्याचे ठरवले. हे कोवळे जीव अकाली प्रौढ बनले आणि त्यांचा हा जगण्याचा संघर्ष सुरू झाला.

या चारजणांच्या पलटणीचे नेतृत्व त्यांच्या ताईने म्हणजेच लेस्लीने केले. सुदैवाने लहानपणापासून लेस्लीने जंगलात कसे राहायचे, याचे धडे गिरवले होते. त्यांनी विमानाच्या अवशेषांमधून 'फरीना' मिळवले व त्यांचा हा प्रवास सुरू झाला. 'फरीना' म्हणजे कसावाचे पीठ. कसावा ही एक झुडुप वनस्पती आहे व ती उष्ण प्रदेशांमध्ये येते. तिच्या मुळाचा उपयोग कंदभाजी म्हणून होतो. आपल्याला ही रताळ्यासारखी भाजी साबुदाण्यामुळेच अधिक माहिती आहे. या कसावाच्या पिठापासूनच साबुदाणा बनवला जातो. हे कसावाचे पीठ शिदोरीला घेऊन या चार अश्राप जीवांचा अ‍ॅमेझॉनसारख्या भयावह जंगलातील प्रवास सुरू झाला. सोबत त्यांनी बाळाचे काही नॅपी, दुधाची बाटली, कात्री, असे काही आवश्यक साहित्यही घेतले होते. काही दिवस त्यांनी या कसावाच्या पिठावर गुजराण केली. हे पीठ संपल्यावर त्यांनी जंगलातील फळे व बिया खाण्यास सुरुवात केली. वाटेत लेस्लीने आपल्या केसांमधील रबर बँडस्चा वापर करून तंबूही उभे केले.

चाळीस दिवस ही मुलं जंगलात तग धरून राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना जंगलाबाबत लहानपणापासूनच मिळालेले ज्ञान. ही मुलं हुईटोटो किंवा विटोटो या आदिवासी समुदायामधील आहेत. त्यांना जन्मापासूनच जंगलाचे धडे मिळत असतात. त्यांचे लहानपणीचे खेळही याच संदर्भातील असतात. त्यांचे आजोबा फिडेन्सियो व्हॅलेन्सिया यांनी सांगितले की, जंगलात कसे राहावे, तिथे काय खावे, काय खाऊ नये, कोणती फळे विषारी असतात व कोणती खाण्यायोग्य असतात, शिकार कशी करावी, मासे कसे पकडावेत, याचे धडे या समुदायात लहान मुलांना दिले जात असतात. या ज्ञानाचा वापर लेन्सीने जगण्याच्या परीक्षेत केला.

इकडे या विमान अपघाताची माहिती जगाला समजली आणि चार लहान मुलं जंगलात हरवल्याचेही समजले; मग सुरू झाला या लहान मुलांना शोधण्याचा अविश्रांत प्रयत्न. किमान 160 सैनिकांनी जंगलाची चांगली माहिती असलेल्या आदिवासी समाजातील 70 लोकांच्या मदतीने हे शोधकार्य सुरू केले. विमान अपघातात ही चार मुलं मृत्युमुखी पडलेली नाहीत, हे समजल्यानंतर या कोवळ्या जीवांना जंगलाच्या खडतर स्थितीतून वाचवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला. हा शोध सुरू असतानाच ही मुलं जिवंत असावीत, याचा सुगावा मिळत गेला तशी ही शोधमोहीम अधिक तीव्र झाली. या मोहिमेत प्रशिक्षित श्वानांचाही समावेश करण्यात आला. विमानाच्या अपघातस्थळाजवळच लहान मुलांच्या दातांचे व्रण असलेली फळे पडली होती. त्यावरून ही मुलं फळे खाऊन तग धरून राहत आहेत, ही आशा होती. मात्र, जंगलातील वन्यजीवांचे धोके तसेच अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या सशस्त्र टोळ्यांचाही धोका होता. त्यामुळे या मुलांना लवकरात लवकर वाचवण्याची धडपड अधिकच तीव्र झाली. वाटेत त्यांना मुलांच्या पायांचे ठसे, डायपर, अर्धवट खाल्लेली फळे, दुधाची बाटली, कात्री, अशा काही खुणा सापडत गेल्या व त्यांचा माग काढत शोधमोहीम पुढे राबवण्यात आली. सैन्याने प्रसिद्ध केलेल्या काही छायाचित्रांमध्ये जमिनीवर पडलेली दुधाची बाटली, एक हेअर बँड, दोन कात्र्या दिसून येतात. या वस्तू पाहून ही मुलं अद्याप जिवंत आहेत, ही आशाही टिकून राहत होती.

चिखलात उमटलेले त्यांच्या पायांचे ठसे मार्ग दाखवत होते. शिवाय, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असलेल्या प्रशिक्षित श्वानांचीही मदत होत होती. तीन हेलिकॉप्टर्सचीही मदत घेण्यात आली; पण पावसाळी वातावरण आणि उंच झाडे यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. मात्र, स्पॅनिश आणि मुलांच्या स्थानिक भाषेतून सूचना देण्यासाठी जंगलावरून अनेक उड्डाणे करण्यात आली. मुलांनी आहेत तिथेच थांबावे, पुढे जाऊ नये वगैरे सूचना करण्यात येत होत्या.

हेलिकॉप्टरमधून मुलं जिथे असतील अशी शक्यता होती तिथे अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्याही टाकण्यात आल्या. मुलांच्या आजीच्या आवाजातही 'पुढे जाऊ नका, आहात तिथेच थांबा' अशा रेकॉर्ड केलेल्या सूचना जंगलावरून उडत चाललेल्या विमानामधून ऐकवल्या जात होत्या. अनेक दिवस शोधमोहीम सुरू असताना या मुलांच्या जीविताची आशाही मावळत चालली होती. अखेर एकेठिकाणी बचाव पथकाला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.

जगभरातील लोकांच्या प्रार्थनेला फळ आले आणि जंगलात हे चारही अश्राप जीव सुरक्षित सापडले! कॅक्वेटा आणि गुआवियारे प्रांताच्या सीमेजवळ जंगलात एकेठिकाणी ही चारही भावंडे सुरक्षित मिळाली. त्याची माहिती स्वतः कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्ताओ पेत्रो यांनी ट्विटरवरून देशवासीयांना व जगाला दिली. 'या मुलांच्या जगण्याच्या संघर्षाची आता इतिहासाने नोंद घेतली आहे, जंगलानेच त्यांना वाचवले, ही जंगलाची मुलं आहेत आणि आता ती अवघ्या कोलंबियाची लाडकी मुलं झाली आहेत,' असे उद्गार त्यांनी काढले! मुलांची आजी मारिया फातिमा व्हॅलेन्सिया यांना कधी एकदा या चौघांना कवेत घेतो, असं झालं होतं! त्यांच्या व्हिलाव्हिसेन्सियो या गावात आजीची व अन्य कुटुंबीयांची या आईविना पोरक्या झालेल्या, जंगलात हरवलेल्या लेकरांची भेट झाली.

या मुलांना पुढील उपचारांसाठी राजधानी बोगोटा येथील लष्करी रुग्णालयात कोलंबियाच्या हवाई दलाच्या विमानाने (एअर अ‍ॅम्ब्युलन्स) हलवण्यात आले. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. पाच वर्षांपूर्वी थायलंडच्या एका मोठ्या व पाण्याने भरलेल्या गुहेत अकरा ते सोळा वर्षांची बारा मुलं अडकली होती. मात्र, त्यांच्या 25 वर्षे वयाच्या कोचने परिस्थिती हुशारीने हाताळल्याने ही मुलं गुहेतही तग धरून राहिली. मोठी मोहीम राबवून या मुलांची सुटका करण्यात आली होती. ही थायी मुलं असोत किंवा कोलंबियातील हे चार लहान जीव, संकटाच्या काळात त्यांनी धैर्याने जो परिस्थितीचा सामना केला तो सर्वांनाच आदर्शवत आहे!

सचिन बनछोडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT