नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या निवासस्थानाजवळ दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकावर हल्ला करणार्या चौघांना अटक करण्यात आली आहे. शकील अहमद, अफसर, अनवर आणि सिकंदर अशी त्यांची नावे आहेत.
अमानतुल्ला खान यांच्या निवासस्थानावर धाड टाकून परतत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाला शिवीगाळ करून काही अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. अटक करण्यात आलेले खान यांचे समर्थक आहेत. अलीकडेच एसीबीने अमानतुल्ला आणि त्यांचा साथीदार हामिद यांच्या घरावर छापेमारी केली होती. वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणात खान यांच्यावर कारवाई सुरु असल्याचे त्यावेळी एसीबीकडून सांगण्यात आले होते.
दिल्ली वक्फ बोर्डात 32 लोकांना बेकायदेशीरपणे नोकरी दिल्याचा तसेच वक्फची मालमत्ता अवैधपणे भाड्याने दिल्याचा खान यांच्यावर आरोप आहे. खान यांचा भागीदार हामीद अली याच्या घरावरील छाप्यात एसीबीने विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आले होते. हे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना हामीदकडे नव्हता. याच ठिकाणी बारा लाख रुपये देखील जप्त करण्यात आले होते. एसीबीच्या पथकाने जामिया, ओखला, गफूर नगर याठिकाणी धाडी टाकल्या होत्या.
हेही वाचा