Latest

JDS Joins NDA : जेडीएसचा एनडीएमध्ये प्रवेश! एचडी कुमारस्वामी यांच्याकडून शिक्कामोर्तब

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : JDS Joins NDA : कर्नाटकातील जनता दल सेक्युलर पक्ष आज (दि. 22) अधिकृतपणे एनडीएचा भाग बनला आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन याला अंतिम मंजुरी दिली आहे. याचा अर्थ आगामी 2024 च्या निवडणुकीत जेडीएस आणि भाजप एकत्र लढणार आहेत. शहा-नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कुमारस्वामी यांच्याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची पोस्ट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भेट घेतली. जेडीएसने एनडीएचा भाग बनण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांचे एनडीएमध्ये मनापासून स्वागत करतो.'

गेल्या लोकसभेत भाजपची कामगिरी कशी होती?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कर्नाटकातून जेडीएस एनडीएमध्ये सामील झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जनता दल (सेक्युलर) सोबत समन्वय असेल असे म्हटले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपसोबतच्या निवडणूक कराराचा भाग म्हणून जेडीएसला लोकसभेच्या चार जागा देण्यावर सहमत असल्याचे समजते आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये भाजपला कोणत्याही किंमतीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. गेल्या वेळी राज्यात पक्षाला मोठा विजय मिळाला होता. 2019 मध्ये राज्यातील लोकसभेच्या 28 पैकी 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर उर्वरित तीन जागांवर प्रत्येकी एक जागा काँग्रेस, जेडीएस आणि अपक्षांच्या खात्यात गेली होती.

SCROLL FOR NEXT