Latest

भारताने युनोत कॅनडाचा बुरखा फाडला

Arun Patil

न्यूयॉर्क, पीटीआय : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र संघातील (युनो) सभेत कॅनडाचा बुरखा फाडला. राजकीय सोयीसाठी दहशतवाद्यांना अभय देऊ नये, अशा शब्दात त्यांनी कॅनडावर निशाणा साधला.

जयशंकर कॅनडाच्या आरोपांना संयुक्त राष्ट्रातील सभेत मुद्देसूद उत्तर देणार असल्याचे जाहीर केले होते. जयशंकर यांनी यासंदर्भात विविध देशांच्या सहपदस्थांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. युनोतील 78 व्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी कॅनडावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, प्रत्येक देशाने सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. ठरावीक देशांनी अजेंडा राबवायचा आणि अन्य देशांनी त्याचे अनुकरण करायचे हा प्रकार आता थांबला पाहिजे. दहशतवादी, अतिरेकी यांना राजकीय सोयीसाठी आश्रय देता कामा नये.

युनोतील सदस्य देशांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. दहशतवादाची झळ बसणार्‍या देशांच्या अंतर्गत बाबींमध्येही अन्य देशांनी हस्तक्षेप करता कामा नये. दहशतवाद, हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍या देशांवर कारवाई करण्यासाठी युनोने पुढाकार घेतला पाहिजे.

खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या हत्येमागे भारतीय गुप्तचर संस्थांचा हात असल्याचा जाहीर आरोप केला होता. ट्रुडो यांनी शिख मतपेढीवर डोळा ठेवून निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप केला होता. जयशंकर यांनी युनोमध्येच कॅनडाच्या कृत्यांचा पर्दाफाश केला.

सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वासाठी आग्रही

संयुक्त राष्ट्र संघातील सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याची भारताने आग्रही मागणी केली. जगातील अन्य देशांनीही भारताच्या या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. जयशंकर यांनी युनोतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. भारताला कायमस्वरूपी प्रतिनिधित्व देण्यासाठीच्या प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विविध देशांच्या सहपदस्थांसोबतही चर्चा केली.

SCROLL FOR NEXT