Latest

पावसाचा नेमका अंदाज वर्तवणारे काय आहेत पूर्वसंकेत

Shambhuraj Pachindre

पुसेसावळी : विलास आपटे

पक्षी व वृक्षांकडून पावसाचे पूर्वसंकेत मिळत असतात. निसर्गाचे निरीक्षण करुन त्यावर आधारित निर्णय जुन्या काळातील लोक घेत असत.सध्या निसर्ग निरीक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाचे संकेत मिळणारे पक्षी व वृक्षांची माहिती असणे गरजेचे आहे.

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार अशी निरीक्षणे आहेत.चातक पक्षी 'पिऊ.. पिऊ' या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजले जाते. चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणार्‍या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत आहे. 'पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरु करत होते.

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढर्‍या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे 'कोड्यान केको.. कोड्यान केको..' अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे समजतात. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांची गडबड सुरू झाली की हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो.कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शेंड्यावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी असते. सहसा कावळा झाडाच्या शेंड्यावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळीणीने अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले असे संकेत जुन्या काळात होते.

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनार्‍याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छीमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनार्‍याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत मच्छीमारांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार असे मानले जाते.

जंगलात हमखास झाडे पोखरणार्‍या वाळवीला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून वाळवीचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरुन सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार असे समजले जाते. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरुन पावसाचे अंदाज बांधले जात आहेत. बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे त्यांच्या निवासात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात.

पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात. मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणार्‍या गोडंबा म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवार्‍याचे संकेत देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.अशा पद्धतीने पक्षी व वृक्षांकडून पावसाचे संकेत मिळत असतात. मात्र ते सध्या दुरापास्त झाले आहेत.

पावसाची सुस्पष्ट चाहूल मिळते माशांच्या जीवनचक्रातून

माशांची पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते. समुद्राच्या दिशेने जाणार्‍या तांबूस रंगाच्या खेकड्यांवरून शेतकर्‍याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणताच विचार आपणाला नसतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT