Latest

बळीराजासाठी 100 दिवसांपासून तरुणाची सायकलवारी! ; शेतकरी बाळासाहेब कोळसे यांची आतापर्यंत 32 जिल्ह्यांमध्ये जनजागृती

गणेश सोनवणे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शेतकर्‍यांची अवस्था बिकट होत असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री व सर्वपक्षीय नेते, पदाधिकार्‍यांनी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या समस्या सोडवाव्यात, कर्जबाजारी शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी कृतिशील कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी आडगाव (जि. अहमदनगर) येथील बाळासाहेब बाबूराव कोळसे या तरुण शेतकर्‍याची तब्बल 100 दिवसांपासून राज्यभर सायकलवारी सुरू आहे.

त्यांनी नुकतीच नाशिकमध्ये हजेरी लावत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देत शेतकरी समस्यांकडे लक्ष वेधले आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून राज्यभरात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या कोळसे यांनी दि. 13 ऑक्टोबरपासून आडगाव येथून सायकलद्वारे जनजागृती सुरू केली आहे.

कोळसे यांनी आतापर्यंत 31 जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करीत साडेचार हजार किलोमीटर अंतर कापले आहे. रोज सुमारे 60 ते 70 किलोमीटर प्रवास ते करतात. बाळासाहेब कोळसे यांनी आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा, सातारामार्गे नगरमध्ये येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले. तिथून ते नाशिकमध्ये आले.
नाशिकमधून ते पुढे मार्गस्थ झाले असून, आता पुढचा मुक्काम पालघर जिल्ह्यात राहणार आहे. तिथून ते ठाणे, मुंबई, मुंबई महानगर अशा पद्धतीने 36 जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करणार आहेत. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असून, पंतप्रधान यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.

कोरोनासारख्या महामारीला हद्दपार करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहेत. जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणार्‍या बळीराजाच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार अशाच प्रकारे प्रयत्न का करत नाही? कोरोनावर यशस्वी संशोधन करून शास्त्रज्ञांनी लस शोधली, ही कौतुकाचीच बाब आहे. परंतु, अशीच एखादी लस शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांनीदेखील संयम ठेवून आत्महत्येचे पाऊल उचलू नये, यासाठीही मी जनजागृती करत आहे.
– बाळासाहेब कोळसे,
तरुण शेतकरी, अहमदनगर

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT