Latest

रत्नागिरी : राजापूर शहरात पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

दिनेश चोरगे

राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजापूर शहर आणि तालुका परिसरात बुधवारी सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. पुराच्या पाण्याने जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला. शहरात पूरस्थिती कायम राहिली. पुराचा वाढता धोका लक्षात घेता राजापूरनगर परिषदेने सायरन वाजवून सावधानतेचा इशारा दिला आहे.

राजापूर तालुक्यात सरासरी 123.62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी शहरातील दोन्ही नद्यांमधील झालेल्या गाळ उपसा कामामुळे शहरातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. सलग कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. सलग दुसर्‍या दिवशी अर्जुना नदीला पूर आल्याने नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये गोवळ परिसरातील 70 टक्के भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वत्र नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मंगळवारी दुपारपासून तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. अर्जुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आले होते. मात्र पावसाचा जोर अद्यापही कमी न झाल्याने गुरुवारी पुराची तीव्रता वाढली. पुराचे पाणी बाजारपेठेच्या मुखाशी आले आहे. बाजारपेठेत फॅमिली बाजारपर्यंत पुराचे पाणी आले.

बुधवारी जवाहर चौकात पाणी आल्याने एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. गुरूवारीही शहरातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजारही एसटी डेपोसमोर महामार्गावर हलवण्यात आला आहे. प्रशासनाने गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पुराची तीव्रता वाढल्याने शहरातील गुजराळी, चिंचबांध वरचीपेठ, आंबेवाडी भागाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी येवून वाहतुक बंद झाली आहे. जवाहर चौकातून धोपेश्वरकडे जाणार्‍या भागातही पाणी असल्याने मार्ग बंद झाला होता . अर्जुना नदीला आलेल्या महापुरामुळे शीळ ,गोठणे दोनिवडेकडे जाणारा रस्ता पुराखाली गेल्याने वाहतूक दुसर्‍या दिवशीही बंद होती. पुराचे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवला होता.

राजापूर तालुक्यात गुरूवारी पावसाची नोंद पुढीलप्रमाणे (मंडलनिहाय): राजापूर मंडल 130 मिमी, ओणी 107 मिमी, कुंभवडे 109 मिमी, नाटे 165 मिमी, जैतापूर 161मिमी, कोंडये तर्फे सौंदळ 89मिमी, पाचल 126 मिमी, सौंदळ 102 मिमी असा एकूण पाऊस 989 मिमी झाला. सरासरी 123.62 मिमी पावसाची नोंद झाली. एकूण पाऊस 15676 मिमी तर सरासरी 1959.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT