Latest

Flipkart ला दणका; ऑनलाईन अ‍ॅसिड विक्री प्रकरणी नोटीस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दिल्ली पोलिसांनी Flipkart या प्रसिद्ध ई कॉमर्स साईटला दणका दिला आहे. ऑनलाईन अ‍ॅसिड  विक्री प्रकरणी दिल्ली पोलिसांनी Flipkart या कंपनीला नोटीस बजावली आहे.

द्वारका येथील सतरा वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. यामधील आरोपीने मुलीवर अ‍ॅसिड फेकण्यासाठी ते Flipkart या प्रसिद्ध ई कॉमर्स साईटवरून मागवले असल्याची माहिती दिली होती. याप्रकरणावरून दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्टला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

द्वारका येथील १७ वर्षीय मुलीवर बुधवारी तिच्या घराजवळ अ‍ॅसिड सदृश पदार्थ फेकणाऱ्या दोघांनी फ्लिपकार्टद्वारे ऑनलाइन खरेदी केल्याचे समोर आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला नोटीस बजावली आहे. या घटनेची दखल घेत आयोगाने फ्लिपकार्ट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून अ‍ॅसिड विकणाऱ्या विक्रेत्यांचे संपूर्ण तपशील मागवले आहेत. तसेच दोन ऑनलाइन मार्केट प्लेसकडूनही २० डिसेंबरपर्यंत सविस्तर कारवाईचा अहवाल मागवला आहे.

महिला आयोगाने बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या आघाडीच्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ऍसिड सहज उपलब्ध आहे, जे बेकायदेशीर आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अ‍ॅसिडची सहज उपलब्धता ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि त्याची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे, असे आयोगाने दोन कंपन्यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टमधून समजणार कोणते अ‍ॅसिड वापरले

पश्‍चिम दिल्लीतील द्वारका परिसरातील ही मुलगी घरातून शाळेत जात होती. मोटारसायकलवरून मुखवटा घालून आलेल्या या दोन तरूण हल्लेखोरांनी मुलीवर अ‍ॅसिड फेकले. या अ‍ॅसिड हल्ल्यात संबंधित पीडितेला गंभीर दुखापत झाली. आरोपीने पीडितेवर नायट्रिक अ‍ॅसिड फेकले असावे जे ई-कॉमर्स पोर्टलद्वारे मागवले होते. असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यात कोणत्या प्रकारचे अ‍ॅसिड वापरले गेले, हे फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणात मुख्य आरोपींसह तीन जणांना अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कायदा…तरीही होते विक्री

सर्वोच्च न्यायालयाने परवान्याशिवाय अ‍ॅसिडच्या ओव्हर-द-काउंटर विक्रीवर देशव्यापी बंदी लादून नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने विक्री होते. अ‍ॅसिड विक्रीप्रकरणी अधिकाऱ्यांकडे सर्व अधिकृत ऍसिड विक्रेत्यांची यादी आहे आणि त्यांना नियमित विक्री अहवाल देणे हे विक्रेत्यांकडून मिळत असते. सर्व नियम असूनही, राष्ट्रीय राजधानीत अॅसिडची अवैध विक्री आढळून येते. पोलिसांकडून विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. तरी देखील अशा अवैध पद्धतीने विक्री सुरूच आहे. यासंबधीत विक्रेत्यांवर विष कायदा १९१९ च्या कलम 4(2) अंतर्गत तात्काळ अटकेची कारवाई करण्यात येते. तसेच विक्रेत्यांना ₹50,000 पर्यंत दंडही ठोठावण्यात येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT