Latest

राष्‍ट्रीय : ‘इस्रो’ची अंतराळ भरारी

Arun Patil

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने देशाचे सर्वात मोठे लाँच व्हेईकल मार्क थ्रीचे नुकतेच प्रक्षेपण केले आणि एक नवा इतिहास रचला. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून 'इस्रो'ने व्यावसायिक उड्डाण करत 36 उपग्रहांना निश्चित केलेल्या कक्षेत स्थापित केले. या प्रक्षेपक वाहनाची लांबी 43.5 मीटर असून उपग्रहाचे वजन 5,805 किलो इतके आहे. हा उपग्रह ब्रिटनच्या एका दळणवळण कंपनीचा असून, त्याची भारतासोबत भागीदारी आहे. 643 टन वजनाचे हे प्रक्षेपण यान 'इस्रो'च्या आतापर्यंतच्या यानांपेक्षा सर्वाधिक वजनदार असून, त्याने आतापर्यंत या पाच यशस्वी उड्डाणे पूर्ण केलेली आहेत. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात या कंपनीचे 36 उपग्रह सोडले होते.

'इस्रो' ही जागतिक पातळीवर महत्त्वाची अंतराळ संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. 'इस्रो'ची कमर्शियल कंपनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड कंपनी ही अनेक देशांचे, कंपन्यांचे उपग्रह विकसित करणे आणि प्रक्षेपण करण्याचे कामही करते. कमी खर्चात प्रक्षेपण करण्याची क्षमता विकसित झाल्याने या संस्थेवरचा विश्वास आणखी वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमात 'इस्रो'चा दबदबा वाढत आहे. हे यश 'इस्रो'च्या प्रतिष्ठेत वाढ करणारे आहे आणि व्यावसायिक सेवेची मागणी वाढविण्यासाठीदेखील हे उड्डाण उपयुक्त ठरेल. 'इस्रो' आणि संबंधित संस्थांचा विकास करण्यास प्राधान्य देण्याबरोबरच सरकारने अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि स्टार्टअपचा सहभाग वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्नांतून सकारात्मक परिणाम पाहावयास मिळत आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका खासगी कंपनीच्या रॉकेटचे 'इस्रो'ने यशस्वी प्रक्षेपण केले.

या प्रक्षेपणानंतर 'वन वेब'चे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) 618 उपग्रहांचा एक गट तयार करण्याचे लक्ष्य पूर्ण झाले. या आधारे जगातील कानाकोपर्‍यात उपग्रहाच्या मदतीने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला. 'वन वेब'ने आतापर्यंत 18 प्रक्षेपणातून हे उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडले. दुसरीकडे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल)चे हे दुसरे मिशन होते. या युनिटने 'वन वेब'च्या 72 उपग्रहांना दोन टप्प्यांच्या मदतीने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थिर केले. यासाठी 'एनएसआयएल'ने 1 हजार कोटींचा करार केला होता. 1999 पासून आतापर्यंत भारताने 422 परकीय उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडले.

वन वेब सॅटेलाईट ही इंग्लंडची कंपनी असून, यामध्ये ब्रिटन सरकारसोबतच भारतातील भारती एंटरप्रायजेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची व्ह्यूज नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाची हनव्हा यांची प्रमुख भागीदारी आहे. या कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. जगभरात अतिजलद आणि दर्जेदार ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ही कंपनी काम करते. वन वेबने 'इस्रो'सोबत एक करार केलेला आहे. या करारानुसार एकूण 72 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांहून अधिक लाँचिंग शुल्क आकारण्यात येणार आहे. 'इस्रो'कडे असणार्‍या सर्वांत मोठ्या ऑर्डर्सपैकी ही एक ऑर्डर आहे. गेल्या दशकभरामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 'इस्रो'ने मिळवलेल्या यशाची ही पोहोचपावती आहे. अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानामध्ये 'इस्रो'ने आता आपले साम्राज्य निर्माण केले आहे. चंद्रावर मानवरहित यानाच्या प्रक्षेपणाबरोबरच स्वतःची नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम, अ‍ॅस्ट्रोसॅट, आरएलव्ही-टीडी हे स्वदेशी बनावटीचे अंतराळ यान, मंगळयान यांसह अनेक यशस्वी मोहिमा 'इस्रो'च्या खात्यात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या आहेत.

संपर्क सेवांव्यतिरिक्त पृथ्वीवरील वातावरणाचे अवलोकन करणे आणि हवामानाच्या पूर्वअंदाजांसह अनेक मंत्रालये आणि विभागांना अंतराळ तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध करून देण्यासाठी 'इस्रो'चे अनेक उपग्रह अवकाशात सक्रिय आहेत. 'इस्रो'ने आपल्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलद्वारे (पीएसएलव्ही – सी 47) आतापर्यंत सिंगापूर, बि—टन, अमेरिका यांसारख्या विकसित देशांचे डझनाहून अधिक उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण केलेले आहे. या मोहिमांमधून 'इस्रो'ला चांगल्या उत्पन्नाचा एक भक्कम मार्ग उपलब्ध झाला आहे. उत्पन्नाचा आणि यशाचा हा सिलसिला आजही कायम आहे. येणार्‍या वर्षांमध्ये याचा वेग अधिक वाढलेला दिसेल. अंतराळ संशोधन आणि उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रात 'इस्रो' अनेक योजनांवर संयुक्तरित्याही काम करत आहे. अँट्रिक्स कॉर्पोरेशन या 'इस्रो'च्या व्यावसायिक शाखेने अनेक देशांबरोबर उपग्रह प्रक्षेपणासाठीचे अनेक करार केलेले आहेत.

विज्ञानाच्या क्षेत्रात 'थांबा' कधीच नसतो. कारण गूढपणाची असंख्य वलये अज्ञात असतात. त्यांच्या अंतरंगात डोकावून या रहस्यांचा विज्ञानाच्या अंगाने उलगडा व शोध लावणे ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात तर 'स्काय इज लिमिट' अशी स्थिती असते. आज जगभरातील अंतराळ संशोधन मोहिमांमधून नित्य नव्याने रंजक आणि थक्क करणारी माहिती समोर येत आहे. विविध ग्रहांचा शोध लावला जात आहे. तार्‍यांचे स्फोट, कृष्णविवरे, ग्रहांचे उपग्रह, नवे ग्रह, तेथील वातावरण अशा अगणित रहस्यांचा उलगडा करण्यामध्ये अंतराळ संशोधक गुंतलेले आहेत. 'इस्रो'ही त्यामध्ये पिछाडीवर नाहीये.

चांद्रमोहिमेनंतर 'इस्रो'ची नजर आता सूर्यावर आहे. आदित्य-एल 1 नामक मोहिमेद्वारे 'इस्रो' सूर्याला गवसणी घालणार आहे. आदित्य-एल 1 हे पृथ्वीपासून 1.5 मिलियन किलोमीटर दूर स्थित असणार आहे आणि तेथून ते सूर्यावर नजर ठेवत सूर्याच्या बाहेरील आवरणाचे, तेजोमंडलाचे विश्लेषण करणार आहे. सूर्याचा कोरोना त्याच्या पृष्ठभागापासून वर असूनही त्याचे तापमान पृष्ठभागापेक्षा 300 पट अधिक का आहे, याचा शोध या मोहिमेद्वारे घेण्यात येणार आहे. सूर्याच्या फोटोस्फेअर, क्रोमोस्फेअर आणि तेजोमंडलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने 'इस्रो'ची ही सौर मोहीमही अत्यंत महत्त्वाची आहे.

केवळ भारतीय वैज्ञानिकच नव्हे, तर जगभरातील अंतराळ संशोधक या सूर्यमोहिमेतील निष्कर्षांची प्रतीक्षा करत आहेत. अर्थात, सूर्यमोहिमेपेक्षा चांद्रमोहिमेच्या यशाकडे आपले अधिक लक्ष असणार आहे. भारताचे चांद्रयान-1 पूर्णपणाने यशस्वी ठरले. परंतु चांद्रयान-2 मोहिमेमध्ये काही कारणास्तव अपयश आले. आता चांद्रयान-3 मोहीम फत्तेह करून दाखवणारच, असा चंग 'इस्रो'च्या चमूने बांधला आहे. अशा अंतराळ मोहिमा यशस्वी होतात तेव्हा जगभरामध्ये एक संदेश जात असतो. आज अमेरिका, जपान, चीन यांची अंतराळ केंद्रे चांद्रमोहिमांमध्ये बरेच कार्य करताना दिसताहेत. भारताने यापुढील काळात आपल्या मित्रदेशांच्या सोबतीने अंतराळ मोहिमा गतिमान करण्याची गरज आहे. यासाठी भारत जपानसारख्या देशाचे सहकार्य घेऊ शकतो.

अमेरिकाही भारताला सहकार्य करू शकतो. अमेरिकेने चंद्रावर मानव उतरवण्याच्या मोहिमेवर खूप वेगाने काम सुरू केले असून, ही मोहीम खूप पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. याद़ृष्टीने भारताला खूप मोठी मजल मारायची आहे, ही बाब खरी असली तरी तिथवर पोहोचणे अशक्य नाही, हे 'इस्रो'च्या अलीकडील काळातील यशावरून ठामपणाने म्हणता येते. एक काळ असा होता की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन देण्यास नकार दिला होता. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहोचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे.

आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भू उपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनवर अवलंबून होते. आपल्या वैज्ञानिकांनी द़ृढ इच्छाशक्ती दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून क्रायोजेनिक इंजिन विकसित केले. 'इस्रो'चे हे स्वदेशी तंत्रज्ञान आता जगभरात अव्वल ठरले आहे. एक काळ असा होता; जेव्हा अमेरिकेने आपल्या 'रोहिणी 75' या रॉकेटच्या प्रक्षेपणाला लहान मुलांचे खेळणे, असे संबोधून भारत कधीच रॉकेट बनवू शकत नाही, अशी अशी उपहासात्मक टिप्पणी केली होती. एवढेच नव्हे, तर अमेरिकेच्या सिनेटने असा दावा केला होता की, अमेरिका भारतीय भूमीवरून कोणत्याही उपग्रहाचे प्रक्षेपण करणार नाही. मात्र वैज्ञानिकांची जिद्द आणि प्रयत्नातील सातत्य यामुळे अमेरिका तोंडघशी पडली. आज अमेरिकाच नव्हे, तर जगातील तमाम विकसित देश भारतातून आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी रांगेत उभे आहेत. भारत हा अंतरिक्ष क्षेत्रातील सर्वांत मोठी महाशक्ती ठरण्याचा दिवस आता फार दूर नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे बाल कुपोषणाचे प्रमाणही जास्त होते. देशात उपासमारी, भूकबळीसारख्या समस्या असताना अंतराळ मोहिमांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरजच काय? असा सवाल अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत देशात काही जणांकडून उपस्थित केला जात होता. परंतु आज उपग्रहांच्या साहाय्याने घडून आलेल्या क्रांतीमुळे या प्रश्नाला चोख उत्तर मिळाले आहे. विशेष म्हणजे, यातून उत्पन्नाचे एक नवे दालन खुले झाले आहे. येणार्‍या काळातील अंतराळातील वाढती स्पर्धा पाहता 'इस्रो'सारख्या विश्वासार्ह आणि खात्रीशीर संस्थेकडे असणारा जगाचा ओढा वाढणार आहे. 'इस्रो'च्या मोहिमांचे वैशिष्ट्य हे केवळ प्रक्षेपणातील यशामध्येच नसून, त्यांसाठी येणारा खर्च हा अत्यंत कमी असतो, हेही आहे. याचाच अर्थ प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि मुबलक वित्तीय साहाय्य असूनही जगभरातील अंतराळ संशोधकांना जे साध्य झाले नाही ते 'इस्रो'च्या संशोधकांनी करून दाखवले आहे. म्हणूनच अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर दबदबा निर्माण करण्यामध्ये अमूल्य योगदान देणार्‍या शास्त्रज्ञांच्या प्रतिभेला, जिद्दीला, समर्पणाला आणि कार्यकर्तृत्वाला सलाम केला पाहिजे.

चांद्रयान-3 अभियानाची तयारी

अलीकडेच 'इस्रो'चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 अभियानाची संपूर्ण तयारी झाली आहे. सगळ्या चाचण्या घेऊन झाल्या आहेत. जीएसएलव्ही मार्क-3 चा उपयोग या प्रक्षेपणासाठी केला जाईल. चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्याच्या द़ृष्टीने योग्य वेळेची चाचपणी करण्यात येते आहे. जून किंवा जुलै महिन्यात हे यान अवकाशात झेपावू शकते. अनेक परीक्षणे आणि चाचण्यांच्या यशामुळे यंदाच्या मोहिमेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत 'इस्रो'च्या वैज्ञानिकांमध्ये आश्वस्तता आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर 'इस्रो'ची अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील वैश्विक महत्ता कैकपटींनी वाढणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT