लंडन : सर्वात सुखाचा प्रवास म्हणजे विमानप्रवास असे मानले जाते. मात्र हल्ली विमानातीलही अनेक विचित्र प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आता ग्लाडलजारा ते मेक्सिको प्रवास करण्यासाठी सज्ज झालेल्या एका विमानातही असाच विचित्र प्रकार घडला आहे. डासांच्या झुंडीने हल्ला केल्याने या विमानाला दोन तास उशीर झाला!
ग्वाडलजारा विमानतळावर हे विमान मेक्सिकोला जाण्यासाठी उभे होते. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसलेही होते. पायलटने विमानाचे उड्डाण सुरू करण्यापूर्वीच एक विचित्र घटना घडली. अचानक डासांची एक झुंडच विमानात शिरली आणि या डासांनी प्रवाशांना दंश करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकाराने लोक हैराण झाले.
हवाई सुंदर्यांनी तत्काळ डास मारण्याचा स्प्रे घेऊन फवारण्यास सुरुवात केली. स्वतः प्रवासीही डासांपासून सुटका करवून घेण्यासाठी वेगवेगळे अजब प्रकार करू लागले. अखेर बर्याच मेहनतीनंतर या डासांना बाहेर पिटाळण्यात आले. या सर्व प्रकारात विमानाला दोन तास उशीर झाला. या विमानतळाच्या जवळच एक सांडपाण्याचा तलाव आहे. अलीकडेच झालेल्या पावसाने तो पूर्ण भरला आहे व त्यामुळे डासही वाढले आहेत. तिथूनच ही फौज विमानात आली होती! या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत असून लोक मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.