Latest

…तर फ्लेमिंगोंचा नवी मुंबईच्या अधिवास धोक्यातच; फ्लेमिंगो सिटीचे काय झाले?

अनुराधा कोरवी

नवी मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेने फ्लेमिंगोंच्या अधिवासावर घाला घातला असून फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच नवी मुंबई महानगरपालिकेने त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या करण्यास परवानगी दिली असल्याने फ्लेमिंगोचा अधिवास अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणथळ जमीन म्हणून राखीव असलेल्या 300 एकर जागेवरील आरक्षण उठवून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या करण्यास परवानगी दिली आहे. याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडीकिनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात.

सुरुवातीला फक्त थंडीच्या काळात येणार्‍या फ्लेमिंगो पक्ष्याला येथील वातावरणासोबतच खाद्य मिळू लागल्याने जवळपास 8 ते 10 महिने फ्लेमिंगोंचा मुक्काम या ठिकाणी होऊ लागला आहे. नेरुळ येथील चाणक्य तलाव आणि डीपीएस स्कूलच्या शेजारील तलावात यांचा अधिवास मोठ्या संख्येने दिसून येतो.

परदेशातून येणार्‍या या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी नवी मुंबईबरोबर मुंबई, ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र आता ही आरक्षित असलेली पाणथळ जागा संपविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. फ्लेमिंगोंच्या अधिवासी जागेवर सिमेंटचे जंगल उभे राहणार असल्याने याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.

महानगरपालिकेने पाणथळ जागांचे आरक्षण कायम न केल्यास याबाबत आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

पर्यावरणप्रेमी आक्रमक

डीपीएस तलावाजवळ 5 फ्लेमिंगोंचा मृत्यू व 7 फ्लेमिंगो जखमी झाले होते. उपचारादरम्यान जखमींपैकी आणखी दोन फ्लेमिंगोचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकूण 10 फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. शहरातील डीपीएस तलावानजीक पाच फ्लेमिंगोंच्या गूढ मृत्यूनंतर 'बीएनएचएस', मॅन्ग्रोव्ह सेल, पालिका अधिकार्‍यांनी तलावाला भेट दिली.

फ्लेमिंगोंच्या मृत्यूची तुकाराम मुंढे करणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवी मुंबईत झालेल्या फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले?असून, या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 10 फ्लेमिंगोंच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या नॅटकनेक्ट फाऊंडेशनच्या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना या समस्येकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रदूषण, पथदिव्यांमुळे फ्लेमिंगो मृत झाल्याचे निरीक्षण

सिडकोने या तलावात येणार्‍या पाण्याचा स्रोत बंद केला आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या मृत्यूला सिडको कारणीभूत आहे. तलावात जाळे टाकल्यानेही त्यात अडकून पक्षी जखमी झाले आहेत, असे सेव्ह फ्लेमिंगो व मँग्रोज संस्थेच्या प्रमुख रेखा साखला यांनी म्हटले आहे. तर, डीपीएस तलाव परिसराची आज प्रत्यक्ष पाहणी केली असून त्याबाबतचा सविस्तर अहवाल मँग्रोव्ह सेलचे प्रमुख व्ही. रामाराव यांना दिला जाणार आहे, असे मँग्रोव्ह सेलचे मुंबई विभागीय वनक्षेत्र अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT