Latest

पिंपरी : सिगारेट विक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

अमृता चौगुले

पिंपरी : प्रतिबंधित सिगारेट विक्री विशालनगर सांगवी येथील माउली पान शॉप, लक्ष्मी चौक हिंजवडी येथील विनोद पान शॉप, अमिता पान शॉप या टपऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट चारने छापे टाकले. यात पोलिसांनी इम्पोर्टेड सिगारेट, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. या कारवाया शनिवारी (दि. 23) करण्यात आल्या. पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखा युनिट चारने माउली पान शॉपवर शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता छापा मारून कारवाई केली. त्यात 13 हजार 352 रुपयांचा इम्पोर्टेड सिगारेट, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा ऐवज आढळला. याप्रकरणी समाधान शामराव जाधव (32, रा. विशालनगर, पिंपळे निलख), नामदेव सर्जेराव शिरोळे (रा. कोथरूड, पुणे) यांना अटक केली आहे.

पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लक्ष्मी चौकातील विनोद पान शॉप या टपरीवर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता छापा मारून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यात 17 हजार 609 रुपयांचा इम्पोर्टेड सिगारेट, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, हुक्का फ्लेवर जप्त केला. श्रीराम कचरू शेळके (26, रा. हिंजवडी) याला श्रीनिवास पाटील उर्फ प्रदीप राजपूत, इर्शाद मोहीन शेख (28, रा. वाकड) या दोघांनी माल पुरविल्याने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीराम आणि इर्शाद यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच, शनिवारी रात्री साडेसात वाजता पोलिसांनी अमिता पान शॉपमध्ये छापा मारून कारवाई केली. त्यात तीन हजार 419 रुपयांचे इम्पोर्टेड सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. आशिष तुकाराम हेंडगे (24, रा. हिंजवडी) याला शाम (रा. तळेगाव) याने हा माल पुरविल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT