Latest

चौदा हजार वर्षांपूर्वी बनली पहिली रोटी?

Arun Patil

नवी दिल्ली : रोटी, भाकरी किंवा चपातीशिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही. सणावाराला आपल्याकडे पुरणपोळ्या बनवल्या जातात. 'पराठे' हा प्रकारही उत्तर भारतातून सर्वत्र पसरला. मात्र, अशा गोल रोट्या सर्वात आधी कधी बनल्या हे माहिती आहे का? अर्थातच याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, एका मतानुसार सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा रोट्या बनवण्यात आल्या.

रोटीचा शोध हा ईशान्य जॉर्डनमधील एका ठिकाणी झाल्याचे म्हटले जाते. काही तज्ज्ञांच्या मते, 14 हजार वर्षांपूर्वी ईशान्य जॉर्डनमधील एका ठिकाणी रोट्या बनवण्यात येत होत्या. त्याचे काही पुरातत्त्वीय पुरावेही सापडल्याचे सांगितले जाते. काही तज्ज्ञांच्या मते, सिंधू संस्कृतीत 5 हजार वर्षांपूर्वी रोटी बनवण्याची पद्धत सुरू झाली. त्या काळात गव्हाची पेस्ट करून गरम दगडावर रोटी बनवली जायची. काहींच्या मते, पर्शियामध्ये रोटी बनवणे सुरू झाले. तिथे थोडी जाड आणि पिठाची भाकरी तयार करण्यात आली.

भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पन्न होते त्यामुळे इथे गोल रोटी बनवण्याची परंपरा सुरू झाली. आता रोट्यांशिवाय किंवा चपाती-भाकरीशिवाय आपण जेवणाची कल्पनाही करीत नाही! वेगवेगळ्या धान्यांपासून रोट्या बनवल्या जात असतात. गव्हाच्या चपात्या असोत किंवा मैद्याच्या रोट्या तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी व मक्याचीही भाकरी बनवली जात असते.

SCROLL FOR NEXT