Latest

पहिला ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने 'महाराष्ट्र उद्योगरत्न' पुरस्कार स्थापन केला आहे. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना हा पहिलाच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या द़ृष्टीने, उद्योगांना सर्व मंजुर्‍या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते.

सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या 11 महिन्यांत राज्यात 1 लाख 18 लाख 422 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. मागच्या काळात उद्योगधंदे राज्याबाहेर का गेले? यासंदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

बारा बलुतेदारांच्या उद्योगांच्या वाढीसाठी रायगड जिल्ह्यात महाड आणि रत्नागिरीला प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवला जाईल. त्यानंतर संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी केली जाईल. मैत्री कायद्यामुळे उद्योजकांनी अर्ज केल्यावर परवानगी देण्यासाठी संबंधित प्रत्येक खात्याला कालावधीची मर्यादा घालण्यात आली आहे. या परवानग्या विहित कालावधीत न दिल्यास उद्योग विभागाच्या आयुक्त्यांना हे अधिकार जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      हेही वाचलंंत का ? 

  • Manipur Viral Video Case: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी
  • iPhone : आयफोन घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या बाळाला विकले!
  • Parliament Monsoon Session : मणिपूर मुद्यावरुन विरोधकांचा संसदेत प्रचंड गदारोळ
SCROLL FOR NEXT