Latest

पुण्यातून धावली पहिली इलेक्ट्रिक शिवनेरी एसटी बस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पहिली इलेक्ट्रिक शिवनेरी एसटी बस सोमवारी पुणे ते ठाणे मार्गावर धावली. स्वारगेट ते ठाणे एसटी स्टँड या मार्गावर एसटी प्रशासनाकडून या गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार एसटी आता आपले रूप बदलायला सुरुवात करत आहे. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच नवीन लालपरी आणि हिरकणी बस सुद्धा दाखल होत आहेत.

त्यातच आता नव्या इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुद्धा एसटी प्रशासनाने घेतले असून त्या सुद्धा प्रवाशांना सेवा पुरवणार आहेत. त्यातील इलेक्ट्रिक शिवनेरी बस काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यातील पहिली बस सोमवार (दि. 01) रोजी स्वारगेट ते ठाणे या मार्गावर धावली आहे. यावेळी एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील म्हणाले, आज पुणे विभागातर्फे पहिली ई-शिवनेरी बस स्वारगेट ते ठाणे सुरु करण्यात आली. पुणे विभागास 7 व ठाणे विभागास 7 अशा एकूण 14 ई-शिवनेरी बस टप्प्या टप्प्याने स्वारगेट ते ठाणे या मार्गांवर सुरु करण्यात येत आहे. या बस दर अर्ध्या तासाला प्रवाशांकरता उपलब्ध असतील. ही बस प्रवाशांच्या पसंतीला उतरून आज पूर्ण बसमध्ये 45 प्रवाशांनी स्वारगेट ते ठाणे प्रवास केला. असे पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT