Latest

महाराष्ट्रात पहिला डोस पूर्णत्वाच्या दिशेने

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्या दिशेने लसीकरण विभागाची वाटचाल सुरू असून डिसेंबरअखेर म्हणजेच येत्या 20 ते 22 दिवसांत राज्यातील 100 टक्के जनतेला पहिला डोस मिळणार आहे. सध्या एकूण लाभार्थ्यांपैकी 85 टक्के जनतेला पहिला डोस मिळाला आहे. उरलेल्या 15 टक्के नागरिकांना डिसेंबरअखेर पहिला डोस (first dose) मिळणार आहे.

राज्यात 18 व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 9 कोटी 14 लाख 35 हजार इतकी आहे. त्यापैकी 7 कोटी 65 लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. अजून 1 कोटी 47 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. मात्र, राज्य शासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. दररोज दहा लाख लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे. त्यापैकी 60 टक्के डोस हे पहिल्या नागरिकांना देण्यात येत आहेत. तर उरलेले 40 टक्के डोस हे दुसर्‍या लसीकरणाचे आहेत, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.

लसीकरणाचा वेग वाढवण्याचे कारण ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे राज्यावर आलेले संकट हेदेखील आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग सध्याच्या डेल्टापेक्षा सात पटींनी अधिक आहे.तज्ज्ञांनी जानेवारीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्‍त केली आहे. यामध्ये ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना बर्‍यापैकी या नव्या विषाणूपासून संरक्षण मिळणार आहे. त्यांना लागण झाली तरी ती फारशी गंभीर नसणार आहे. त्यामुळे लसीकरणाचे कवच वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. (first dose)

या जिल्ह्यांमध्ये विशेष देणार लक्ष

राज्यात ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लसीकरण लाभार्थींची संख्या जास्त आहे. ठाण्यात 74 लाख, नाशिक 51 लाख, जळगाव 34 लाख, अहमदनगर 36 लाख, नांदेड 27 लाख आणि सोलापूर 34 लाख लाभार्थी आहेत. या सर्व ठिकाणी अनुक्रमे 15 लाख, 12 लाख, 9.63 लाख, 9.25 लाख, 9.22 लाख आणि 9.18 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी असून इतर जिल्ह्यांमध्ये बर्‍यापैकी लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहेत.

मुंबई व पुणे राज्यात आघाडीवर (first dose)

राज्यात मुंबई आणि पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. मुंबईमध्ये तर 92 लाख लसीकरणाचे लक्ष्य होते. त्यापेक्षा तीन लाख अधिक लसीकरण झाले आहे. पुण्यात लाभार्थ्यांची संख्या 83 लाख आहे. त्यापैकी 82 लाख 60 हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे. आता उरलेल्या 82 हजार नागरिकांना डोस देण्यात येत आहे. हा देखील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

निम्म्या जनतेला दुसरा डोस

राज्यातील 9 कोटी 14 लाख लाभार्थ्यांपैकी 4 कोटी 37 लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे. ही टक्केवारी सर्वसाधारणपणे 49 टक्के इतकी आहे. तर सध्या राज्यात आजच्या तारखेला 85 लाख लाभार्थी कोव्हिशिल्डच्या दुसर्‍या डोसच्या तर 13 लाख लाभार्थी कोव्हॅक्सिनच्या दुसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

SCROLL FOR NEXT