Latest

तेरखेडा : मराठवाड्यातील ‘हे’ गाव आहे प्रति शिवकाशी, जाणून घेऊया या फटाक्यांच्या गावाबद्दल

दीपक दि. भांदिगरे

रत्नापूर (उस्मानाबाद) : बाळासाहेब जाधवर; दिवाळी सणानिमित्त मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा फटाका नगरी सजली आहे. महाराष्ट्रातच नाही तर परराज्यातही येथील सुतळी ॲटम बॉम्बला मागणी अधिक असते. 'दिवाळी सण मोठा तिथे वाजला पाहिजे तोटा' अशी म्हण पूर्वीपासून चालत आलेली असल्याने दिवाळी सणांमध्ये तोटे, फटाके वाजवणे ही परंपरा आहे. त्यातच तेरखेडा गावातील फटाके नगरीची ओळख अख्या महाराष्ट्रात व परराज्यात आहे.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीत दिवाळी सण गेल्याने सण साजरा न करता केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचे काम देशातील जनता करत होती. कोरोनाचे संकट कमी झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्याची शिवकाशी तेरखेडा नगरी सज्ज झाली आहे. हे फटाक्यांचे माहेरघर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात परराज्यात प्रसिद्ध असल्याने सध्या या ठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.

दिवाळी सण म्हटलं की घराघरात आनंद असतो. त्यामुळे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गोडधोड फराळांसोबत फटाके वाजवणे ही परंपरा आहे. तेरखेडा येथील तोटा चांगल्या पद्धतीने वाजतो अशी लोकांची भावना आहे. याचा परिणाम असा होतो की येथून मोठ्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त फटाके विक्री होते. यामुळे या गावात पूर्वीपेक्षा सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने थाटली गेली आहेत.

तेरखेडा ॲटम बॉम्ब, सुतळी ॲटम बॉम्ब, भुरनुळे, फॅन्सी तोटे, फटाकड्या, आवाजाची फुलबाजी, भुरनाळे याची मागणी परराज्यात वाढत आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोना महामारी असल्याने फटाके व्यवसायाला मंदी आली होती. पण यावर्षी मात्र कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात दरही वाढले आहेत. तरीही नागरिकांचा प्रतिसाद मोठा आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड या ठिकाणाहून मागणी वाढत आहे.
– फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका असोसिएशन

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT