Latest

फटाका स्टॉल टाकायचाय, मग हे वाचाच..! किचकट नियमांमुळे व्यावसायिक हैराण

अमृता चौगुले

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात दिवाळीची धामधूम दिसू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील व्यावसायिक तरुणांनी फटाका स्टॉल टाकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी तामिळनाडू (शिवकाशी), अहमदनगर, जामखेड (तेरखेडा) या भागातून फटाक्यांची घाऊक दराने खरेदी करण्यात येते; मात्र अनेकांना फटाका स्टॉलसाठी परवाना आवश्यक असल्याची माहितीच नाही. त्याविषयी 'पुढारी' ने केलेला हा विशेष वृत्तांत.

परवाना मिळवण्यासाठी हे करा

पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्याकडून केल्या जाणार्‍या लिलावात भाग घेण्यासाठी प्रथम पोलिस आयुक्त कार्यालयातील चारित्र्य पडताळणी विभागातून 'ना हरकत' दाखला घ्यावा. एक रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावून अर्ज करावा, त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. लिलावात जागा घेतल्यानंतर शोभेच्या दारू विक्रीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. लिलावात घेतलेल्या जागेचा तपशील कागदपत्रांसह पोलिसांकडे सादर करणे गरजेचे आहे. अर्जासोबत व्यवसायाचे ठिकाण, मोजमाप, आजूबाजूचा परिसर व रस्ते दर्शविणारा कच्चा नकाशा, जागा योग्य असल्याबाबतचा मनपा/नगरपालिका/ग्रामपंचायतीचा 'ना हरकत' दाखला जोडावा. परवाना मिळवण्यासाठी सहाशे रुपये पोलिस आयुक्त कार्यालयातील परवाना शाखेत रोख स्वरुपात भरावे लागणार आहेत. परवाने मंजुरीचे काम पोलिस उपआयुक्त, मुख्यालय, पिंपरी चिंचवड या कार्यालयांकडून होणार आहे.

परवाना मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडील ना-हरकत दाखला, जागा मालकीची असल्यास मालकी संबंधी अथवा भाडेतत्त्वावर असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र या बाबतची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. याशिवाय गतवर्षी परवाना घेतला असल्यास त्याबाबत तपशील व परवान्याची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी. अर्जासोबत सादर केलेल्या छायांकित प्रती नोटराईज / साक्षांकित करून सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतरही परवाना मिळेलच असे नाही, कारण सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठिकाणी परवाने देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच, अर्जासोबत आवश्यक माहिती, दाखले व इतर कागदपत्रे जोडलेली नसल्यास, अपूर्ण अर्ज आणि मुदती नंतर प्राप्त होणार्‍या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे तरुणांनी अर्क करतेवेळीच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे गरजेचे आहे.

शेवटचे पाच दिवस

फटाका स्टॉलसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत आहे. अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिस उपआयुक्त, मुख्यालय (परवाना शाखा, पिंपरी चिंचवड) यांचे कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. वाटप करण्यात आलेले परवाने 26 ऑक्टोबरपर्यंतच वैध राहतील. तसेच, मंजूर परवाने पोलिस उपआयुक्त मुख्यालय (परवाना शाखा, पिंपरी चिंचवड) यांच्या कार्यालयातून सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत वाटप करण्याचे काम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT