Latest

पुणे: बेकायदा सावकारी प्रकरण, गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेच्या विरोधात गु्न्हा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोथरुड भागातील गुंड गजानन मारणे टोळीतील पप्पू कुडले याने व्याजाने दिलेल्या पैशांवरुन एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडले आणि साथीदारांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच मारहाण करुन धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

अतुल उर्फ पप्पू कुडले (रा. दत्तवाडी), बांदल, बालाजी उर्फ भैय्या कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष विष्णू तिंबोळे (वय 38, रा. ओमसाई अपार्टमेंट, जुनी सांगवी) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिंबोळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. त्या वेळी त्याची मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडले याच्याशी ओळख झाली होती. तिंबोळेला पैशांची गरज होती. त्याने कुडले याच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते.

त्यानंतर त्याने कुडले याला मुद्दल आणि व्याजासह एकवीस लाख रुपये परत केले होते. कुडले याने तिंबोळेकडे आणखी वीस लाख रुपये देण्याची मागणी केली होती. येरवड्यातील गुंजन टॉकीज चौकात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडले आणि त्याच्या साथीदारांनी तिंबोळेला बोलावून घेतले. तिंबोळे, त्याचे मित्र विशाल धुमाळ, कृष्णा अगरवाल आणि गौतम खुराणा यांना कुडलेने धमकावून त्याच्या मोटारीत बसवले. तसेच तिंबोळेला धमकावून 82 हजार रुपये कुडलेने घेतले. त्यानंतर तिंबोळे आणि मित्राला मोटारीतून उतरण्यास सांगण्यात आले. 'तु जर मला व्याजाचे पैसे दिले नाही, तर आम्ही तुझा हात कापून टाकू,' अशी धमकी देऊन कुडले पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT