Latest

सांगली शिवसेनेकडे, भिवंडी राष्ट्रवादीला

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जागावाटपाच्या सूत्रात शिवसेना मोठा भाऊ ठरला आहे. ते 21 जागांवर तर काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 10 जागांवर लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरे गटच लढविणार असून भिवंडी राष्ट्रवादी (शरद पवार) लढणार आहे. सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे गेल्याने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. येथे बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही असलेले काँग्रेस नेते आ. विश्वजित कदम 'नॉट रिचेबल' आहेत. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार काँग्रेसचे सरचिटणीस सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत मुंबईतील जागांबाबत पक्षाची बाजू मांडू शकले नाहीत. त्यामुळे पराभूत होणार्‍या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत, अशी तक्रार गायकवाड यांनी केली.

दुसरीकडे जागावाटपावरून आघाडीत मतभेद नसल्याचा निर्वाळा शरद पवार यांनी दिला. मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीत विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार करत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महाविकास आघाडीची मंत्रालयासमोरील 'शिवालय' येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी आघाडीत कोणता पक्ष किती जागा आणि कुठे लढणार याची माहिती दिली. त्यामुळे आघाडीत गेले काही दिवस जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

घोसाळकरांनी प्रचार थांबविला

उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. आता काँग्रेस पक्षाला ही जागा सोडल्यानंतर घोसाळकर यांची समजूत काढणार का, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. पण जागावाटपाच्या चर्चेत उत्तर मुंबई आम्ही लढायची की काँग्रेसने लढायची, याबाबत चर्चा सुरू होती. दिवस पुढे जात होते म्हणून घोसाळकर यांनी तयारी केली होती. पण आता घोसाळकर हे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी वर्तवला.

असे आहे जागावाटपाचे सूत्र

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : 21 जागा – जळगाव, परभणी, नाशिक, कल्याण, पालघर, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलडाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई.

काँग्रेस : 17 जागा – नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 10 जागा- बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT