Latest

FIFA World Cup : कतारला जात असाल तर ‘हे’ कडक नियम जाणून घ्या, नाहीतर…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA World Cup Qatar : येत्‍या 20 नोव्हेंबरपासून फुटबॉलचा महाकुंभ कतारमध्‍ये सुरू होत आहे. यजमान कतार स्पर्धेसाठी सर्वो‍तोपरीने प्रयत्‍न करत आहे. दरम्यान, पहिल्यांदाच आखाती देशात होत असलेल्या या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दहा लाखांहून अधिक प्रेक्षक कतारला जाणार आहेत. ही अशी एक जागतिक स्पर्धा आहे जिथे यजमान देशात नॉनस्टॉप पार्टीचे वातावरण तयार झालेले असते. पण यंदा त्यात वेगळेपण असू शकते. फुटबॉल वर्ल्ड कपच्या निमित्ताने कतार देशवासीय परदेशी नागरिकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. असे असताना तेथील लोक मद्यपान सारख्या गोष्टींबद्दल कमी सहनशील आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.

कतारची न्यायव्यवस्था ही शरिया कायद्यावर आधारीत आहे. पाश्चात्य देशांकडून अनेकदा त्यावर टीका करण्यात आली आहे. मात्र आता फुटबॉल वर्ल्ड कप (FIFA World Cup Qatar) सारखी जागतिक स्पर्धा या देशात होत असल्याने कतारने आपल्या देशात जगभरातून येणा-या फुटबॉल चाहत्यांसाठी आपल्या कायद्यात शिथिलता आणण्याचा विचार केला आहे. पण तरीही या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कतारला जात असलेल्या चाहत्यांनी कतारचे कायदे आणि सांस्कृतिक चालीरीतींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. यात मद्यपान, लैंगिकता आणि ड्रेस कोड यासंबंधीचे नियम समाविष्ट आहेत. चला त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया.

मद्यपानाबाबत काय नियम आहेत?

कतारमध्ये परवाना असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्येच मद्यपान केले जाऊ शकते. त्यामुळे इतर कुठेही मद्यपान करणे बेकायदेशीर आहे. मात्र, दोहामधील बिगर मुस्लिम रहिवासी ज्यांच्याकडे दारूचा परवाना आहे, ते घरी बसून मद्यपान करू शकतात. वर्ल्ड कप (FIFA World Cup Qatar) स्पर्धेत चाहत्यांना स्टेडियम कंपाऊंडमध्ये बडवायजर बिअर खरेदी करण्याची परवानगी असेल. तसेच चाहत्यांना संध्याकाळच्या वेळेस दोहा येथील 'फॅन झोन'मध्ये मद्यपान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे, कतारमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे. मद्यपान करण्याचे कायदेशीर वय 21 आहे आणि बारमधील बाउन्सर अनेकदा तेथे प्रवेश करताना फोटो आयडी किंवा पासपोर्ट तपासतात.

ड्रग्स बाबत नियम? (FIFA World Cup Qatar)

ड्रग्ज, गांजा आणि अंमली पदार्थ जसे की, अॅम्फेटामाइन्स यांसारख्या ओव्हर-द-काउंटर ड्रग्जवर बंदी घालण्याच्या बाबतीत कतार हा जगातील सर्वात प्रतिबंधित देशांपैकी एक आहे. बेकायदेशीर ड्रग्सची विक्री, तस्करी केल्यास दीर्घ कारावास आणि आर्थिक दंडासह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर वर्ल्ड कप चाहत्यांना या कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. देशात प्रवेश करण्यापूर्वी तेथील अधिकारी नवीन सुरक्षा तंत्रज्ञानाने प्रवाशांची बॅग स्कॅन करतात.

लैंगिकतेबाबतही नियम… (FIFA World Cup Qatar)

कतारमध्ये अविवाहित महिला आणि पुरुषांमधील लैंगिक संबंधांना गुन्हा मानले जाते. मात्र, फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. अविवाहित जोडपे हॉटेल रूम शेअर करू शकते, असे तेथील सरकारने जाहीर केले आहे. तथापि, कतारच्या सरकारी पर्यटन वेबसाइटच्या माहितीनुसार रस्त्यावर जोडप्याने जवळीकता टाळणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर कतारचा कायदा गे आणि लेस्बियन सेक्सला गुन्हा मानतो. असे केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच क्रॉस ड्रेसिंग हा देखील गुन्हा मानला जातो.

ड्रेस कोडची काळजी घ्या

कतारच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटने महिला आणि पुरुषांना तेथील संस्कृतीचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. फिफा वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये येणा-या लोकांनी संपूर्ण अंग झाकलेले असेल असे कपडे परिधान करावेत. शरीराचा भाग उघडा राहिल असे कपडे घालू नयेत. चाहत्यांनी त्यांचे खांदे आणि गुडघे झाकले जातील असेच कपडे वापरावेत. शॉर्ट आणि स्लीव्हलेस टॉप परिधान करण्याला मनाई आहे. शहरातील मशिदींमध्ये जाणाऱ्या महिलांना डोके झाकण्यासाठी स्कार्फ देण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT