Latest

FIFA World Cup 2022 : रोनाल्डोने चाहत्यांना निराश नाही केले

मोहन कारंडे

विश्वचषक विश्लेषण; प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील : लियोनल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार हे आजमितीचे आघाडीचे खेळाडू आहेत. जगभरात त्यांचे फॅन फालोअर्स भरपूर आहेत. यापैकी मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला पहिल्याच सामन्यात मोठ्या अपसेटला पराभूत व्हावे लागल्यामुळे त्याचे चाहते निराश झाले होते; परंतु रोनाल्डोने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. ग्रुप 'एच'मधील या सामन्यात पोर्तुगालने घानाविरुद्ध 3-2 गोलने मात करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली. बलाढ्य पोर्तुगालला घानाने अतिशय चांगली लढत दिली, पण त्यांची ही लढत पुरेशी नव्हती. पहिल्यापासूनच पोर्तुगाल संघाने आक्रमक धोरण स्वीकारत घानाच्या गोलपोस्टवर धडक मारण्यास सुरुवात केली होती, पण त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. पोर्तुगाल संघाचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आक्रमक खेळ करत बर्‍याच वेळेला वैयक्तिक प्रयत्न केले, पण घानाच्या बचावपटूंनी त्याला कोणतीही संधी मिळू दिली नाही. याचवेळी घाना संघाने होल्डिंग डिफेन्स करत काऊंटर अटॅकवर भर दिला होता. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

दुसर्‍या हाफमध्येसुद्धा दोन्ही संघांनी पहिल्या हाफमधील रणनीतीचा अवलंब केला. पोर्तुगाल आक्रमक खेळत होते, तर घाना बचावात्मक खेळ करत संधी मिळेल त्यावेळी काऊंटर अटॅक करत होते. हा सामना पोर्तुगालने 3-2 गोलने जिंकला आणि तीन गुणांची कमाई केली. सामना जरी पोर्तुगालने जिंकला असला तरी त्यांच्या बचाव फळीतील उणिवा दिसून येत होत्या. स्पर्धा पुढे जाईल तसे या उणिवा त्यांना दूर कराव्या लागतील. तसेच संघाचा महत्त्वाचा खेळाडू ब्रुनो फर्नांडिस या सामन्यात चमकला नाही. या सामन्यात रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली खेळणारा पोर्तुगालचा संघ अतिशय भक्कम वाटला. रोनाल्डोमध्येसुद्धा चांगला आत्मविश्वास आणि उत्साह जाणवत होता. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे वैयक्तिक खेळ न करता सांघिक खेळ करत पोर्तुगालने हा विजय सोपा केला.

ब्राझीलने गमावली मोठ्या विजयाची संधी

ग्रुप 'जी'मधील या सामन्यामध्ये संभाव्य विजेत्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आणि सार्‍या फुटबॉल जगताच्या गळ्यातील ताईत असणार्‍या ब्राझील संघाने सर्बियावर 2-0 गोलने आरामात मात केली. तसे बघायला गेले तर ब्राझीलने हा सामना मोठ्या गोलफरकाने जिंकायला हवा होता. पण त्यांच्या बर्‍याच संधी वाया गेल्या तर काही बॉल गोलपोस्टवर आदळले. त्यामुळे सर्बियावरील मोठ्या पराभवाची नामुष्की टळली.

एकूण सामन्याचा विचार केला तर ब्राझीलने त्यांचे नैसर्गिक आक्रमण ही रणनीती अवलंबली होती. वेगवान खेळ करत शॉर्टपासद्वारे त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या होत्या. या सामन्यात ब्राझीलच्या खेळातून फुटबॉल खेळाचे सौंदर्य काय असते याची एक झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. मागच्या विश्वचषकामध्ये नेमारने वैयक्तिक खेळास प्राधान्य दिले होते आणि संघाची रणनीतीसुद्धा त्याच्या अवतीभोवती फिरत होती, पण या सामन्यात ब्राझीलने सांघिक खेळावर भर दिला. सर्वच खेळाडूंनी अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. याउलट सर्बियन खेळाडू ब्राझील समोर निष्प्रभ ठरत होते. त्यांनी फक्त बचावात्मक खेळावर भर दिला आणि ब्राझीलला गोल मारण्यापासून रोखण्याचे काम केले. संपूर्ण सामन्यात ब्राझीलने 24 वेळा सर्बियन गोलपोस्टवर धडक मारली. यातील 10 आक्रमणे प्रत्यक्ष गोलपोस्टवर होती. यातूनच ब्राझीलच्या आक्रमणाची धार दिसून येते. एकूणच अतिशय चांगली सुरुवात करत ब्राझीलने विश्वचषक उंचावण्याच्या दिशेने आगेकूच केलेली आहे.

SCROLL FOR NEXT