Latest

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिना आज क्रोएशियाशी भिडणार

Arun Patil

दोहा, वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक फुटबॉल (FIFA World Cup 2022) स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून मंगळवारी मध्यरात्री 12.30 पासून अर्जेंटिना आणि क्रोएशिया या तगड्या संघांमध्ये उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे.

उपांत्य फेरीतील दुसरा सामना बुधवारी रात्री 12.30 पासून फ्रान्स आणि मोराक्को यांच्यात होईल. या चार संघांपैकी कोणता संघ झळाळत्या विश्वचषकावर आपले नाव कोरणार याकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यात कागदावर लियोनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचे पारडे जड दिसत असले तरी क्रोएशियाचा संघदेखील धोकादायक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातील संभाव्य द्वंद्वाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडविरुद्ध अर्जेंटिना यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-3 अशा फरकाने बाजी मारली. तथापि, या सामन्यात अर्जेंटिना शिस्तभंग केल्याचा आरोप फिफाने केला आहे. एकाच सामन्यात पाच पिवळी कार्ड मिळाल्यानंतर फिफाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते.

मेस्सीबद्दल प्रश्नचिन्ह (FIFA World Cup 2022)

मेस्सीचा ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे त्याच्यासोबत क्रीडा प्रेमींच्या भावना जुळल्या आहेत. तथापि, अर्जेंटिना संघावर कारवाई झाल्यास कर्णधार मेस्सीला उपांत्य सामन्यात खेळण्याची संधी कितपत मिळेल यावरून शंका व्यक्त केल्या जात आहेत. मेस्सी हा स्टार फुटबॉलपटू असून अर्जेंटिनाच्या संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मेस्सीची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो आपल्या संघाला अजिंक्यपद मिळवून देण्याचे स्वप्न पाहत आला आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने आतापर्यंतच्या सामन्यात एकूण 4 गोल झळकावले आहेत.

दुसरीकडे क्रोएशियाच्या संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासून झकास प्रदर्शन केले आहे. बेल्जियमविरुद्ध त्यांनी आक्रमणाला मुरड घालून तो सामना बरोबरीत सोडविला. तसेच धोकादायक मोरोक्कोविरुद्ध त्यांनी तेच तंत्र अवलंबले. त्यामुळे तो सामनादेखील गोलशून्य बरोबरीत सुटला.

उपांत्यपूर्व सामन्यात मात्र, क्रोएशियाने चिवट खेळाचे अप्रतिम प्रदर्शन घडविले. या लढतीत ब्राझीलचे पारडे जड आहे असे वाटत होते. पण, सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने कमाल केली आणि पाहता-पाहता त्यांनी ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आणले. त्या धक्क्यातून ब्राझीलचा संघ आणि चाहते अजूनही बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्जेंटिना :

पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अर्जेंटिना संघावर टिकेची झोड उठली होती. मात्र, नंतर त्यांनी जबरदस्त उसळी घेतली. पुढच्या सामन्यात मेस्सीच्या चमूने मेक्सिकोला 2-0 असा तडाखा दिला आणि तिसर्‍या लढतीत पोलंडचाही तशीच गत केली. हा सामना अर्जेंटिनाने 2-0 अशा फरकाने खिशात टाकला. उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा फरकाने नमवले.

क्रोएशिया :

क्रोएशियाने या स्पर्धेत आक्रमक खेळावर भर देताना पहिल्याच सामन्यात कॅनडाला 4-1 अशा फरकाने चिरडले. त्यानंतर मात्र त्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. बेल्जियम आणि मोरोक्को या दोन्ही संघांविरुद्ध त्यांचे सामने गोलशून्य बरोबरीत सुटले. सरस कामगिरीच्या बळावर क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठून तिथे त्यांनी ब्राझिलसारख्या कसलेल्या संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. त्यामुळे क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाला फाजिल आत्मविश्वास नडू शकतो.

SCROLL FOR NEXT