Latest

FIFA WC 2022 : पुरुष फुटबॉलपटूंवर ‘या’ तीन महिला रेफरींचा अंकुश! फिफा वर्ल्ड कपमध्ये घडणार इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC 2022 : कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी अशा अनेक गोष्टी असतील ज्या वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला आणि अनुभवायला मिळतील. जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणा-या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे पहिल्यांदाच आखाती देशात आयोजन करण्यात येत असून या जागतिक स्पर्धेत तीन महिला रेफरीच्या भूमिकेत आपला ठसा उमटवताना दिसणार आहेत. कतारमध्ये महिला चाहत्यांवर काही निर्बंध असले तरी काही नवीन बदलही पाहायला मिळणार आहेत.

फिफाने (FIFA)ने या स्पर्धेसाठी जगभरातून 36 रेफरी, 69 सहाय्यक रेफरी आणि 24 व्हीएआर (VAR) यांची निवड केली आहे. मैदानी रेफरी म्हणून तीन महिलांची सुद्धा निवड करण्यात आली आहे. यात स्टेफनी फ्रानपार्ट (फ्रान्स), सलीमा मुकानसांगा (रवांडा) आणि योशिमी यामाशिता (जपान) यांचा समावेश आहे. या तिघींशिवाय नुजा बेक (ब्राझील), कॅरेन डायझ मेडिना (मेक्सिको) आणि कॅथरीन नेस्बिट (अमेरिका) यांन सहाय्यक पंच म्हणून निवडण्यात आले आहे. (FIFA WC 2022 first time women will play the role of referee)

तीन महिला रेफरींबद्दल जाणून घेऊया (FIFA WC 2022 first time women will play the role of referee)

स्टेफनी फ्रानपार्ट : फ्रान्सची स्टेफनी फ्रानपार्ट ही UEFA चॅम्पियन्स लीग सामन्यात रेफरीची भूमिका बजावणारी पहिली महिला होती. याशिवाय तिने वर्ल्ड कप पात्रता आणि फ्रेंच फुटबॉल टूर्नामेंट लीग-1 मध्येही सहभाग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच टूर्नामेंट लीगच्या अंतिम फेरीत रेफरी म्हणून मैदानात उतरत इतिहास घडवला. गतवर्षी युरो कप स्पर्धेदरम्यानही ती मैदानात दिसली होती, मात्र तिची भूमिका चौथ्या रेफरीपर्यंत मर्यादित होती. फ्रानपार्टने 2019 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला रेफरीचा पुरस्कार जिंकला आहे.

सलीमा मुकानसांगा : रवांडाची सलीमा मुकानसांगा या वर्षी आफ्रिका कप सामन्यात रेफरी म्हणून काम पाहणारी भूमिका बजावणारी पहिली महिला ठरली. सलीमा 2012 पासून फिफासाठी रेफरी म्हणून काम करत आहेत. ती एक व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू होती. सलीमा म्हणते, मला बास्केटबॉल खेळ आवडतो. या खेळात मला करियर करायचे होते. पण बास्केटबॉलच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे मी फुटबॉलची रेफरी होणे निवडले. 2019 महिला वर्ल्ड कप, टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये रेफरी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर मी आता कतारला पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये रेफरी म्हणून मैदानावर उरणार आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदायी घटना आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

योशिमी यामाशिता : जपानी रेफरी यामाशिता योमिशी फ्रान्समध्ये 2019 महिला वर्ल्ड कपमध्ये काम केल्यानंतर सलग दुसऱ्या वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत महिला प्रथमच रेफरी म्हणून काम करताना अभिमान वाटतो. महिलांची क्षमता नेहमीच वाढत आहे हे यावरून सिद्ध होतंय. योशिमीने यंदाच्या एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये इतिहास घडवला. या स्पर्धेत रेफरी बनणारी ती पहिली महिला ठरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT