Latest

Birth Rate : जननदर २०५० मध्ये १.२९ टक्क्यापर्यंत घसरणार

Arun Patil

कोल्हापूर : लोकसंख्येच्या आघाडीवर जगात प्रथम क्रमांकावर असलेल्या भारताचे चित्र बदलत आहे. देशातील प्रजननाचा दर झपाट्याने खाली घसरत आहे. 2050 मध्ये हा दर 1.29 पर्यंत खाली येईल. याचा अर्थ एका महिलेपासून सरासरी अपत्याचे प्रमाण 1.29 इतके असेल आणि यामुळेच भारतीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घसरणीला लागणार आहे.

जगविख्यात 'लॅन्सेट' या आरोग्य नियतकालिकामध्ये नुकतेच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 2021 मध्ये प्रजननाचा हा दर सरासरी 1.91 इतका नोंदविला गेला. तो येत्या 25 वर्षांत 1.29 पर्यंत खाली जाईल, असा अंदाज अहवालामध्ये व्यक्त केला केला आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रजननाचा हा दर खाली येत आहे. संशोधकांच्या मते जगातील 204 देशांपैकी 155 देशांत म्हणजेच एकूण 76 टक्के भूभागावर प्रजननाचा दर हा मृत्युदराच्याही खाली जाण्याचा अंदाज आहे, तर या शतकाच्या अखेरीस या स्थितीला जगातील 198 म्हणजे 97 टक्के जग येईल.

भारतात 1950 मध्ये प्रजननाचे हे प्रमाण 6.18 टक्क्यांवर होते. 1980 मध्ये ते घसरून 4.60 टक्क्यांवर, तर 2021 मध्ये ते 1.91 टक्क्यांवर खाली आले आहे. याला सरकारचे लोकसंख्या नियंत्रण धोरण उपयोगी ठरले, तसे महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात झालेल्या अमूलाग्र वाढीने त्याला मोठा हातभार लावला आहे. जगभरात वाढती लोकसंख्या ही विकासाला खिळ बसविणारे मोठे कारण असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. आता लोकसंख्यावाढीचा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.

मनुष्यबळाची कमतरता भासणार

लोकसंख्येच्या घसरणीचे जसे लाभ आहेत, तसे समाजशास्त्रीय तोटेही अधोरेखित करण्यात येत आहेत. यामध्ये भविष्यात उद्योगांना मनुष्यबळाची मोठी कमतरता पडू शकते. अपत्याच्या प्राधान्यक्रमामुळे भविष्यात विवाहासाठी अनुरूप जोडीदार मिळणे, तर कठीण होईल शिवाय प्रत्येकाने मुलासाठी हट्ट धरला, तर त्याला आजन्म ब्रह्मचारी म्हणून राहण्याचाही धोका समोर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT