Latest

‘प्रोजेक्ट चित्ता’ला मोठे यश! कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘आशा’ने दिला तीन पिलांना जन्म

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. येथे मादी चित्ता आशाने तीन बछडयांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे. चित्ता प्रकल्पा अंतर्गत नामिबियातून चित्ते भारतात आणण्यात आले होते. मात्र मध्यंतरी काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रोजेक्टवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आशाने ३ पिलांना जन्म दिल्यामुळे प्रोजेक्टबाबत पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर याबद्दल पोस्ट केली. केंद्रीय मंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रकल्पाशी निगडित सर्व तज्ञ, कुनो वन्यजीव अधिकारी आणि भारतभरातील वन्यजीव प्रेमींचे हार्दिक अभिनंदन. पीएम मोदींनी कल्पिलेल्या चित्ता प्रकल्पाचे हे एक मोठे यश आहे.'

कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या 14 प्रौढ आणि चार बछडे आहेत. यामध्ये गौरव, शौर्य, वायु, अग्नि, पवन, प्रभास आणि पावक या 7 नर बिबट्यांचा समावेश आहे, तर 7 मादी बिबट्यांमध्ये आशा, गामिनी, नभा, धीरा, ज्वाला, नीरवा आणि वीरा यांचा समावेश आहे. यापैकी फक्त दोनच चित्ते खुल्या जंगलात असून ते पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाहता येतात, तर उर्वरित सर्व चित्त्यांना मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये देशातील पहिली चित्ता सफारी बनवली जाणार आहे. येथे सेसाईपुरा येथील कुनो नदी परिसराचा समावेश करून पर्यटकांसाठी चित्ता सफारी विकसित करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता, ज्याला कुनो महोत्सवापूर्वी मंजुरी मिळाली आहे. आता यावर लवकरच काम सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च येणार आहे.

SCROLL FOR NEXT