विशाखापट्टणम, वृत्तसंस्था : देशांतर्गत क्रिकेट गाजवणार्या सर्फराज खान याला इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीसाठी भारतीय संघात निवडले गेले; पण त्याने या निवडीपूर्वी सर्फराजने अनेक चढ-उतार पाहिले. अनेकदा निराशा आली, कारकीर्द संपल्यासारखी वाटली. परंतु, माझे वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. वडिलांचा माझ्या नेहमी मेहनतीवर विश्वास होता, असे सर्फराजने एका मुलाखतीत सांगितले.
या निवडीनंतर त्याने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या इथवरच्या प्रवासाबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तो म्हणाला, 'माझ्या वडिलांनी माझी क्रिकेटशी ओळख करून दिली; पण मला नेहमी प्रश्न पडत होता की, मी का खेळतोय? मी आक्रमक फलंदाज आहे. मी इतरांपेक्षा लवकर आऊट व्हायचो आणि मोठ्या धावा करणे कठीण होत होते. मी धावा करत नसताना इतरांना यश मिळते हे पाहून निराश होत होतो. मी मुंबईहून उत्तर प्रदेश संघात गेलो तेव्हाही माझे वडील मला भेटण्यासाठी फ्लाईटने येत होते.
निवड चाचणीपूर्वी ते गच्चीवर किंवा रस्त्यावरच गोलंदाजी करून माझ्याकडून फलंदाजीचा सराव करून घ्यायचे,' असे सर्फराज म्हणाला. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे महत्त्व मला आता कळतेय. जेव्हा मी यूपीहून मुंबईला परत आलो, तेव्हा मला भीती वाटली की, माझ्या कारकिर्दीला ब्रेक लागणार आणि माझ्यापुढे भविष्य नाही, असे मला ठामपणे वाटले. परंतु, माझे वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. वडिलांचा माझ्या नेहमी मेहनतीवर विश्वास होता.
'मी सहजासहजी समाधानी होत नाही आणि हिच माझी ताकद आहे. मी दररोज 500-600 चेंडू खेळतो. जर मी एका सामन्यात किमान 200-300 चेंडू खेळलो नाही, तर मला चुकल्यासारखे वाटते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी सराव करण्याची सवय झाली आहे. जर तुम्हाला पाच दिवसांचे क्रिकेट खेळायचे असेल, तर तुम्हाला संयम राखून दररोज सराव करावा लागेल. मी दिवसभर क्रिकेट खेळतो आणि त्यामुळेच मी खेळपट्टीवर बराच वेळ राहू शकतो,' असेही दुसर्या कसोटीपूर्वी सर्फराज म्हणाला.
'मला विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सर व्हिव्हियन रिचर्डस् आणि अगदी जावेद मियाँदाद यांचा खेळ पाहणे आवडते. माझ्या वडिलांनी मला सांगितले आहे की, मी मियाँदाद यांच्यासारखा खेळतो. मी जो रूटची फलंदाजीही पाहतो. ते कसे खेळतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, जेणेकरून मी काही शिकू शकेन,' असेही सर्फराज खान याने टीम इंडियातील निवडीबाबत म्हटले.