Latest

रिव्हर्स मोडमध्ये सर्वाधिक वेग घेणारी इलेक्ट्रिक कार

Arun Patil

बर्लिन : जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक मोटारींपैकी एक 'रिमॅक नेव्हेरा' या गाडीने आता अनेक विक्रम नोंदवले आहेत. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक गाडीचा वेग ताशी 412 किलोमीटर आहे. जर्मनीतील सरळ चार किलोमीटर लांबीच्या ऑटोमोटिव्ह टेस्टिंग पापेनबर्ग ट्रॅकवर या गाडीची चाचणी घेऊन तिचा वेग तपासण्यात आला. ही गाडी केवळ 1.95 सेकंदांमध्येच ताशी शून्यापासून शंभर किलोमीटरचा वेग पकडू शकते. इतकेच नव्हे तर रिव्हर्स मोडमध्येही या मोटारीने ताशी 274 किलोमीटरचा वेग पकडून नवा विक्रम केला आहे.

रिमॅक नेव्हेराने एकाच दिवसांत वीसपेक्षा अधिक विक्रम मोडले आहेत. आता तिने रिव्हर्स मोडमध्ये सर्वात गतीने जाणारी कार बनण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. वेगवान 'ईव्ही' प्रॉडक्शन कार बनण्याशिवाय, नेव्हेराकडे एक चतुर्थांश मैलापेक्षा अधिक वेगाने धावणार्‍या कारचाही किताब आहे, जो तिने 8.582 सेकंदात पूर्ण केला होता.

या गाडीत चार इलेक्ट्रिक मोटर्स बसवले आहेत जे 1914 बीएचपीची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहेत. याशिवाय ग्राहकांना देण्यात आलेल्या मोटारी ताशी 352 किलोमीटर वेगाच्या आहेत. जगातील सर्वात वेगवान प्रॉडक्शन कार बनण्याचा किताब अद्यापही 'कोनिंगसेज अगेरा आरएस'कडे आहे. या गाडीची 2017 मध्ये चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी तिचा वेग ताशी 447.18 किलोमीटर नोंदवण्यात आला होता. ही कार 1360 बीएचपी पॉवर जनरेट करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT