Latest

शेतकर्‍यांचे शास्त्रज्ञ : डॉ. एम. एस. स्वामीनाथन

Arun Patil

काही दिवसांपूर्वी आपण प्रा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना गमावले. एका द्रष्ट्या वैज्ञानिकाला, ज्यांनी देशातील कृषिविज्ञानात क्रांती आणली, ज्यांचे योगदान भारत कायमच सुवर्ण अक्षरात नोंदवून ठेवेल, असे महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. प्रा. स्वामीनाथन यांचे देशावर खूप प्रेम होते आणि विशेषतः देशातील शेतकरी समृद्ध व्हावेत, असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व उमदे होते आणि त्याच्या बळावर खरे तर ते सहज कोणत्याही करिअरची निवड करू शकले असते. मात्र, 1943 मध्ये बंगालमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाने ते हेलावून गेले आणि त्याचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली, आपण कृषिक्षेत्राचा अभ्यास करायचा.

अगदी तरुण वयात ते अमेरिकन कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या संपर्कात आले आणि त्यांचा आदर्श ठेवत स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. 1950 साली अमेरिकेत व्याख्यातापदी काम करण्याची त्यांना संधी मिळत होती, मात्र त्यांनी ती विनम्रपणे नाकारली कारण त्यांना भारतात आणि भारतासाठी काम करायचे होते. भारतासमोर असलेल्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ते एखाद्या अविचल पर्वतासारखे अढळ राहून, देशाला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्याचे काम करत होते, ती परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्यायला हवी. स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांत भारताने अत्यंत खडतर अशा आव्हानांचा सामना केला आणि त्यातील एक प्रमुख आव्हान म्हणजे अन्नटंचाई. 60 च्या दशकाच्या सुरुवातीला देशावर दुष्काळाचे काळे सावट पसरले होते आणि त्यावेळी प्रा. स्वामीनाथन यांची अढळ बांधिलकी आणि दूरद़ृष्टी यामुळे देशात कृषी समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला. कृषी क्षेत्रातील विशेषतः गहूविषयक संशोधन हे त्यांचे दिशादर्शक कार्य होते. त्यांनी गव्हाची नवी सुधारित वाणे विकसित केली. या त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. अशा प्रकारे अन्नटंचाई असलेल्या भारताला त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीमुळे त्यांना 'भारतीय हरित क्रांतीचे जनक' अशी उपाधी मिळाली.

हरित क्रांतीने भारताच्या अशक्य ते शक्य करून दाखवण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. आपल्यासमोर जर अब्जावधी आव्हाने असतील, तर त्या आव्हानांवर मात करण्यासाठी अभिनवतेच्या ज्योतीने तेवणारी अब्जावधी मनंही आपल्याकडे आहेत. हरित क्रांती सुरू झाल्याच्या पाच दशकांनंतर भारतीय शेती खूपच आधुनिक आणि प्रगतीशील झाली आहे. मात्र, डॉ. स्वामीनाथन यांनी रचलेला पाया कधीच विसरता येणार नाही. वर्षानुवर्षे त्यांनी बटाटा पिकांवर परिणाम करणार्‍या परजीवींचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे बटाटा पीक थंड हवामानात जगवणे शक्य होऊ शकले. आज जग भरड धान्य किंवा श्री अन्न हे सुपरफूड असल्याची चर्चा करत आहे. पण डॉ. स्वामीनाथन यांनी 90 च्या दशकापासूनच भरड धान्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी चर्चा सुरू केली होती.

डॉ. स्वामीनाथन यांच्यासोबत माझे खूप बोलणे होत असे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे 2001 मध्ये मी हाती घेतल्यानंतर या संवादाला सुरुवात झाली. त्या काळात गुजरात शेती क्षमतेसाठी ओळखला जात नव्हता. लागोपाठचा दुष्काळ, मोठे चक्रीवादळ आणि भूकंप यांचा राज्याच्या विकासावर परिणाम झाला होता. आम्ही सुरू केलेल्या अनेक उपक्रमांपैकी मृदा आरोग्य कार्ड हा एक उपक्रम होता. यामुळे आम्हाला शेतातील मातीसंदर्भात अधिक चांगल्या प्रकारे माहिती समजून घेता आली आणि समस्या उद्भवल्यास त्या सोडवता आल्या. याच योजनेच्या संदर्भात मी डॉ. स्वामीनाथन यांची भेट घेतली. त्यांनी या योजनेचे कौतुक केले आणि त्यासाठी बहुमोल माहितीही पुरवली. ज्यांना या योजनेबद्दल साशंकता होती, त्यांना ती पटवून देण्यासाठी डॉ. स्वामीनाथन यांचे समर्थन पुरेसे होते. अंतिमतः यामुळे गुजरातच्या कृषी क्षेत्रातील यशाचा पाया रचला गेला.

माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आणि मी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावरही आमच्यामधील संवाद सुरूच राहिला. 2016 मध्ये मी त्यांना आंतरराष्ट्रीय कृषी-जैवविविधता काँग्रेसमध्ये भेटलो आणि पुढील वर्षी 2017 मध्ये मी त्यांनी लिहिलेली दोन भागांची पुस्तक मालिका प्रकाशित केली. शेतकर्‍यांचे वर्णन करताना 'कुरल' या तमिळ भाषेतील प्राचीन छंदबद्ध रचनेत म्हटले आहे की, शेतकरी हा जगाला एकत्र ठेवणारा एक घटक (एक टाचणी) आहे. कारण शेतकरीच सर्वांना जगवतात. हे तत्त्व प्रा. स्वामीनाथन यांना चांगलेच समजले. अनेक जण त्यांना 'कृषी वैज्ञानिक' म्हणून संबोधतात, मात्र ते त्याहूनही अधिक काही होते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला. ते खरे 'शेतकर्‍या'चे वैज्ञानिक, शेतकर्‍यांचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या हृदयात शेतकरी होता.

त्यांच्या कामाचे यश केवळ त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेपुरते मर्यादित नसून, प्रयोगशाळेच्या बाहेर, बागांमध्ये आणि शेतांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. त्यांच्या कामाने वैज्ञानिक ज्ञान आणि त्याचा व्यावहारिक उपयोग यामधील अंतर कमी केले. मानवी प्रगती आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यातील नाजूक संतुलनावर भर देत त्यांनी शाश्वत शेतीचे सातत्याने समर्थन केले. याठिकाणी मी हेदेखील नमूद करतो की, डॉ. स्वामीनाथन यांनी लहान शेतकर्‍यांचे जीवन सुधारण्यावर आणि त्यांना नवोन्मेषाची फळे मिळावीत, यावर विशेष भर दिला. विशेषत: महिला शेतकर्‍यांचे जीवन सुधारण्याची त्यांना तळमळ होती. डॉ. स्वामीनाथन यांच्याबाबत आणखी एक पैलूदेखील उल्लेखनीय आहे. तो म्हणजे, नवोन्मेषाचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे स्थान नेहमीच अढळ राहिले.

जेव्हा त्यांनी 1987 मध्ये जागतिक अन्न पुरस्कार पटकावला, तेव्हा हा प्रतिष्ठित सन्मान मिळविणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नफाविरहित संशोधन फाऊंडेशन स्थापन करण्यासाठी वापरली. आजपर्यंत ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये व्यापक कार्य करत आहे. त्यांनी असंख्य लोकांना शिकण्याचे आणि नवोन्मेषाचे संस्कार देत याबद्दल यांच्यामध्ये आवड निर्माण केली. झपाट्याने बदलणार्‍या जगात, त्यांचे जीवन आपल्याला ज्ञान, मार्गदर्शन आणि नवोन्मेष या त्यांच्या चिरस्थायी सामर्थ्याचे स्मरण करून देते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्था उभारल्या, उत्साहपूर्ण संशोधन करणार्‍या अनेक संशोधन केंद्रांचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र 2018 मध्ये वाराणसीमध्ये सुरू करण्यात आले.

डॉ. स्वामीनाथन यांना आदरांजली वाहण्यासाठी पुन्हा मी 'कुरल' या तमिळ भाषेतील प्राचीन साहित्य रचनेचा हवाला देईन. त्यात लिहिले आहे की, ज्यांनी योजना द़ृढतेने आखल्या असतील, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांना पाहिजे त्या मार्गाने फलित प्राप्त करतील. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे डगमगून न जाणारे होते, त्यामुळे आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांनी ठरवले होते की, त्यांना शेतीला बळ द्यायचे आहे आणि शेतकर्‍यांची सेवा करायची आहे. आणि त्यांनी ते अनोख्या पद्धतीने, नावीन्यपूर्ण रीतीने आणि उत्कटतेने केले. कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि शाश्वततेच्या मार्गावर वाटचाल करत असताना डॉ. स्वामीनाथन यांचे योगदान आपल्याला निरंतर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. शेतकर्‍यांच्या हिताला पाठबळ देणे, वैज्ञानिक शोधाची फलनिष्पत्ती आपल्या कृषी विस्ताराच्या मुळांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करणे, पुढील पिढ्यांसाठी वृद्धी, शाश्वतता आणि समृद्धी वृद्धिंगत करणे, या त्यांनी जपलेल्या तत्त्वांप्रती आपली बांधिलकीही आपण सुनिश्चित करत राहिली पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT